- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार हरिदास भदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, पक्षाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे अकोला पूर्व मतदारसंघात बंडाळी रोखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर निर्माण झाले आहे.अकोला पूर्व मतदारसंघाचे सलग दहा वर्षे आमदार म्हणून राहिलेले आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेले माजी आमदार भदे यांना पुन्हा या मतदारसंघातून ‘वंचित’ने संधी दिली आहे.मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर, वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे आणि काँग्रेसचे विवेक पारसकर यांच्यात तिरंगी लढत रंगणार असली तरी, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांची उमेदवारी कायम राहिल्यास मतदारसंघातील निवडणूक रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार भदे आणि माजी मंत्री डॉ. भांडे आमने-सामने येणार आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षात कुठलीही बंडाळी झालेली नाही. त्यामुळे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विवेक पारसकर यांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी त्यांनी बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येत उमेदवारी अर्ज दाखल करुन लक्ष वेधले. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची असलेली उपस्थिती आघाडी एकसंघ असल्याचे चित्र निर्माण करणारी होती. या पृष्ठभूमीवर विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांच्यासमोर काँग्रेस आणि वंचित या पक्षाच्या उमेदवारांचे तगडे आव्हाण उभे ठाकले आहे.
अकोला पूर्व : बंडाळी रोखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:48 PM