- राजेश शेगाेकारअकाेला - पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्र अंतर्गत शिरपूर येथे विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या नऊ जणांवर महावितरण विभागाने कारवाई केली.
शिरपूर येथे सिंगल फेसच्या रोहित्रावर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने वारंवार रोहित्र पेटविल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक दिवस तसेच तासन्तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे चित्र आहे. शिरपूर येथे मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याची माहिती मिळताच महावितरण ग्रामीण विभाग अकोला व पातूरचे उपअभियंता संतोष खुमकर यांच्या मार्गदर्शनात सहायक अभियंता स्वप्निल भोपळे, सारिका चव्हाण, अमित मिरगे, सस्ती वीज उपकेंद्राचे प्रभारी कनिष्ठ अभियंता मयूर देशमुख, विनय लांडे, श्रद्धा बंड, प्रसाद देशमुख यांनी सोमवारी शिरपूर येथे धाड टाकून नऊ जणांवर कारवाई करून मीटर जप्त केले. लवकरच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम अंतर्गत तसेच गुप्त माहितीवरून शिरपूर येथे वीज चोरी करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध कारवाई करून मीटर जप्त केले. वीज चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापुढेही वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई सुरूच राहील.- मयूर देशमुख, प्रभारी कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र सस्ती
दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाईवीज चोरी होत असल्याने दोन महिन्यांपूर्वी महावितरण विभागाने धाड टाकून पंधरा जणांवर कारवाई केली. दोन महिन्यांत महावितरण विभागाकडून दुसऱ्यांदा कारवाई केली असून, वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले.