- अतुल जयस्वालअकोला - राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर अनुभवी, कुशल, वीज कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी वीज कामगार १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मागील १५ ते २० वर्षांपासून फक्त १४ हजार, १५ हजार रुपये प्रतिमाह काम करत असलेल्या अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदारविरहीत रोजंदारी पध्दतीने वयाच्या ६० वर्षांपर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत सामावून घेणे, समान वेतन द्यावे, संविधानिक शासकीय देय रकमेचा अपहार करणाऱ्या व कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे आदी मागण्यांवर यात चर्चा करण्यात आली. भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.
या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी राज्यातील २८ जिल्ह्यांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. याशिवाय अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. बुधवार, १ नोव्हेंबर २०२३ रोजी काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने कंत्राटी कामगारांनी मंत्रालयावर उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष गणेश धारपवार यांनी केले आहे.