अकोला : ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू करण्यासाठी ‘आयसीएमआर’ने शनिवारी मंजुरी दिल्यानंतर ‘आयसीएमआर’नेही अंतिम परवानगी दिल्याने रविवारी अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू करण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी दिली. पहिल्याच दिवशी २५ जणांचे ‘स्वॅब’ तपासणीसाठी घेण्यात आले. या नमुनाचा अहवाल ८ ते १० तासामध्ये येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.प्रयोगशाळेची निर्मिती ही केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग योजनेंतर्गत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात आली. त्यांतर्गत महाराष्ट्रात सहा ठिकाणी ही प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, त्यामध्ये अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा समावेश आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणेमार्फत घेण्यात आलेल्या गुणवत्ता चाचणीमध्ये अकोला जीएमसी पास झाल्याने प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी ‘आयसीएमआर’कडे अंतिम परवानगी मागण्यात आली होती. ‘आयसीएमआर’ची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने रविवारी प्रयोगशाळा सुरू केली. प्रयोगशाळा उभारणीसाठी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले. प्रयोगशाळा उभारणीसाठी अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश नैताम, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन अंभोरे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, डॉ. रूपाली मंत्री, डॉ. पूजा शहा, डॉ. स्वाती गुप्ता, डॉ. नाजनीन, प्रदीप देशमुख, संदीप लोणारकर व नासिर खान यांनी प्रयत्न केले.अकोला, वाशिम, बुलडाण्यातील ‘स्वॅब’ तपासल्या जाणार!अकोल्यातील प्रयोगशाळेत अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. प्रारंभी दिवसाला जवळपास ५० ‘स्वॅब’ची तपासणी केली जाणार आहे; परंतु ही लॅब एकाच दिवसात जवळपास ९० रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यास सक्षम आहे.
दिवसाला८० नमुन्यांची चाचणीप्रयोगशाळेत दिवसाला ८० नमुन्यांची चाचणी केली जाणार आहे. प्रयोगशाळेत प्रामुख्याने अकोल्यासह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांचे ‘स्वॅब’ तपासण्यात येणार आहेत.
कोरोना, स्वाइन फ्लूसह इतर विषाणूजन्य आजारांचे होणार निदान!प्रामुख्याने ही प्रयोगशाळा स्वाइन फ्लूसाठी उभारण्यात येणार होती; मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही प्रयोगशाळा तातडीने उभारण्यात आली. त्यामुळे प्रयोगशाळेत आता स्वाइन फ्लू, कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारांचे निदान करण्यात येणार आहे.