अकाेला : पहिल्यांदाच घरात पाणी शिरले, सगळे वाहून गेले, आहे ते भिजले, रात्रभर घरातील पाणी काढत हाेताे, एकही काेरडा कपडा राहिला नाही, आभाळच फाटले अशा शब्दात पूरग्रस्त कुटुंबांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे व्यथा मांडली. दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने संपूर्णअकोला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसदृश पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला. मोर्णा व विद्रुपा नद्यांना मोठा पूर आल्याने अकोला शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. काही भागात नाल्यांनीही रौद्रावतार धारण केल्याने अकोला शहरातील मोठा भाग जलमय झाला होता. खडकी, न्यू खेतान नगर, कौलखेड, गीतानगर, जुने शहर, डाबकी रोड, अनिकट, बाळापूर नाका या भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरे आणि घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे अनेक वस्त्यांमधील नागरिकांना रात्रभर जीव मुठीत धरून काढावी लागली. या पैकी न्यू खेतान नगर, ड्रीमलँड कॉलनी, खडकी, शिवसेना वसाहत, रिधोरा या परिसरात शुक्रवारी पालकमंत्री बच्च कडू यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली तसेच पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्या. अनेक नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी अनेक महिला आणि नागरिकांना अडचणी मांडताना अश्रू अनावर झाले. पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामा आणि पंचनाम्याचे आदेश दिलेत. जिल्हाधिकारी यांचे वाहन अडविले जिल्हाधिकारी निमा अराेरा या पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आल्या असता खेतान नगर परिसरात पाहणीसाठी गेल्या असता तेथील महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या गाडीसमोर येऊन त्यांना गाडी थांबवायला लावली. यावेळी संतप्त महिलांनी आपल्या व्यथांना वाट माेकळी करून दिली. जिल्हाधिकारी अराेरा यांनी पूरग्रस्तांचे म्हणणे ऐकून मदतीचे आश्वासन दिले. हरबऱ्याला आले काेंब न्यू खेतान नगर येथील ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील हरबरे, तूर ओली झाली. या कडधान्याचे पाेते दाेन दिवस पाण्यात राहिल्याने धान्याला काेंब आले. घरातील सर्व साहित्य पाण्यात भिजल्याने या कुटुंबाची माेठी आर्थिक हानी झाली आहे.
Akola Flood : साहेब , हाेते नव्हते ते सर्वच गेले; पुरग्रस्तांनी मांडली व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:07 AM