अकोला : शहरातील जेल चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर तसेच डाबकी रोड व न्यू तापडिया नगर येथील रेल्वे गेटवरही उड्डाणपुलाचे काम सुरू आहे; परंतु या तिन्ही ठिकाणचे काम अर्धवट अवस्थेत असून पुलावर चढण्यासाठी डांबरीकरण पूर्ण झाले आहे; मात्र या ठिकाणी बॅरिकेड्स न लावल्याने वाहन चालकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित कंपनी व प्रशासनाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गत दोन वर्षांपासून अकोला क्रिकेट क्लब ते जेल चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सुरुवातीला उड्डाणपुलाच्या आजूबाजूला पर्यायी मार्ग तयार करण्यास निष्काळजीपणा करण्यात आला. आता अर्ध्यापेक्षा जास्त उड्डाणपुलाचे काम होत आले आहे. टावरकडून उड्डाणपुलावर जाण्यासाठी डांबरीकरणसुद्धा करण्यात आले आहे; परंतु पुलाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथे बॅरिकेड्स लावणे गरजेचे आहे. बॅरिकेड्स नसल्याने या पुलावर काही तरुण मुले वाहन घेऊन जात आहेत. त्यामुळे येथे घटना होण्याची शक्यता आहे. हीच स्थिती डाबकी रोड रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाची आहे. हा पूल २०१६ पासून निर्माण करण्यात येत आहे. या पूल २०१८ पर्यंत पूर्णत्वास येण्याचा करार होता; मात्र या पुलाचे काम कासव गतीने सुरू आहे. जाजू नगरकडून या पुलावर जाण्यासाठी डांबरीकरण झाले आहे; परंतु येथील बॅरिकेड्स नाही. हा रस्ता मुंबई-खामगाव मार्गाला जोडलेला असल्याने येथून वाहनांचे ये-जा सुरू असते. दरम्यान, शहराच्या बाहेरून येणारे वाहनचालक चुकून पुलावर गेल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती न्यू तापडिया नगर रेल्वे गेटवरील पुलाची आहे. या ठिकाणीही जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे; मात्र बॅरिकेड्स नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक या पुलावर गेल्यास अपघात होऊ शकतो.
युवकांची स्टंटबाजी
एकीकडे उड्डाणपूल व रेल्वे गेटवरील पूल शहरातील अज्ञात वाहनचालकांसाठी धोकादायक आहे. तर दुसरीकडे काही तरुण युवक या ठिकाणी वाहनांची स्टंटबाजी करताना आढळून येत आहे. त्यामुळे येथे दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न विचारला जात आहे.