अकोला: पोलीस अधीक्षक अमोघ गावकर हे शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप सिटी कोतवालीचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी केल्यानंतर त्यांची बदलीची विनंती मान्य करून त्यांची तातडीने बुलडाणा येथे बदली करण्यात आली; मात्र त्यांच्या बदलीमागे अनेक कांगोरे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.नाईकनवरे व पोलीस अधीक्षक यांच्यातील संभाषणाच्या आॅडिओ क्लिप रविवारी दिवसभर व्हायरल झाल्या होत्या. सर्वोपचार रुग्णालयात आसाम येथील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणचे सीसी कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त करण्यासाठी नाईकनवरे यांना गावकर यांनी वारंवार सूचना देऊनही त्यांनी दिरंगाई केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या संभाषणाच्या आधारावर कोरोना बाधिताची आत्महत्या आहे की हत्या, या संशयाचा धूर निघत असल्याची चर्चा आहे. आसाम येथील कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केल्यानंतर या वॉर्डाच्या परिसरात चार जण येताना व जाताना दिसत असल्याचे गावकर नाईकनवरे यांना सांगतात दिसतात त्यामुळे यासंदर्भातील सीसी कॅमेरे तातडीने ताब्यात घेण्याची सूचना पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सिटी कोतवालीचे ठाणेदार यांना केली; मात्र त्यांनी या गंभीर प्रकरणाचे फुटेज ताब्यात घेतले नसल्याची माहिती या दोन अधिकाऱ्यांच्या संभाषणावरून स्पष्ट होते. यासोबतच आणखी एका गंभीर तपासाबाबत गावकर यांनी नाईकनवरे यांना विचारणा केली असल्याचे स्पष्ट होत आहे.या प्रकारानंतर नाईकनवरे यांनी पोलीस अधीक्षक हे अपमानास्पद वागणूक देत असून, शिवीगाळ केल्याचा आरोप करीत आजारी रजेवर जात असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पत्र लिहिल्याचेही व्हायरल झाले; मात्र संध्याकाळी नाईकनवरेंच्या बदलीच्या विनंतीवरून त्यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी तातडीने बुलडाणा येथे बदली केली.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे पत्र परस्परकोरोना बाधित असलेल्या आसाम येथील रुग्णाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे पत्र पोलीस अधीक्षक यांची परवानगी न घेताच नाईकनवरे यांनी दिले. या पत्रावरूनही पोलीस अधीक्षकांनी त्यांना विचारणा केल्याचे आॅडिओ क्लिपमध्ये स्पष्ट होते.
संभाषणामध्ये गंभीर प्रकारसर्वोपचार रुग्णालयातील सीसी कॅमेरे जप्त का करत नाही? अशी नाईकनवरे यांना विचारणा करणारे संभाषण व्हायरल झाले असून, यामध्ये पोलीस अधीक्षक चार लोकांचा सदर ठिकाणावर वावर असल्याचे बोलतात. यावरून सदर प्रकरण गंभीर असल्याचे दिसून येत असून, आसाम येथील त्या कोरोना बाधिताच्या आत्महत्येमागे आणखी काय आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सिटी कोतवालीचे नवे ठाणेदार उत्तम जाधवउत्तम जाधव यांच्याकडे सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचा प्रभार देण्यात आला आहे. उत्तम जाधव यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांनी तपास सुरू केला आहे.