लोकमत न्यूज नेटवर्कपातूर (अकोला): पातूर-वाशिम रोडवरील घाटाजवळील चिंचखेड फाट्याजवळ सोमवार १८ डिसेंबरच्या सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास बाभूळ, निंबाच्या पेर्या व जलतनाची विना परवाना वाहतूक करणार्या एम.एच. ३0 एबी ११७0 क्रमांकाचा ट्रक अडवून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी ट्रक जप्त केला. या ट्रकमधील ८ ते १0 टन वजनाच्या ६0 हजार रुपये किमतीच्या पेर्या व तीन लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ३ लाख ६0 हजार रुपयांचा माल जप्त करुन वाहन चालकाविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२६ चे कलम ४१ व महाराष्ट्र अधिनियम २0१४ चे कलम ३१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षक एन.सी. गोंडाने यांच्या मार्गदर्शनात पातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.डी. देशमुख, पातूरचे क्षेत्र सहाय्यक एस.यू. वाघ, अविनाश घुगे वनरक्षक यांच्या पथकाने केली. पातूर वनपरिक्षेत्रांतर्गत चोंढी, माळराजूरा, बोडखा व पातूर असे चार राऊंड आहेत व त्या चार राऊंडमध्ये १७ बीट आहेत. या बीटमधून बर्याच वेळा विनापरवाना आडजात लाकडाची वाहतूक होत असते. मागील एका महिन्यात अशा चार घटना उघडकीस आल्या असून त्याबाबत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी एक महिना अगोदर बाभूळगाव रोडवर, दुसर्यांदा ७ डिसेंबर रोजी पातूर-अकोला रोडवरील चिखलगावजवळ कारवाई करून एम.एच.३0 एल. ५६६ क्रमांकाच्या वाहनामधील बेहाळा व बाभूळीच्या बारा पेर्या व जलतन असा २0 हजार रुपये किंमतीचा ३ टन माल व एक ते दीड लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. मालाचा दंड न भरल्यामुळे सदर वाहन सध्या वनविभागात उभे आहे. अवघ्या एका महिन्यात तीन घटना उघडकीस आल्यामुळे आडजात लाकडाची विना परवाना वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
विना परवाना आडजात मालाची वाहतूक केल्याप्रकरणी मोका पंचनामा व गुन्हा दाखल करुन गाडी ताब्यात घेतली आहे. याबाबत संबंधिताकडे कागदपत्राची मागणी केली. मालाची व गाडीची कागदपत्रे मिळाल्यानंतर तो माल कुठला आहे त्यासंबंधी तपास करुन दंड करण्यात येईल.- जी.डी. देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातूर