अकोला : महापालिका करवाढीच्या विरोधात काँग्रेसची गांधीगिरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:12 AM2018-01-30T00:12:32+5:302018-01-30T00:12:50+5:30
अकोला : महापालिकेतील सत्ताधार्यांनी अकोलेकरांवर लादलेली करवाढ मागे घेण्याची मागणी करीत काँग्रेसच्यावतीने सोमवारी सत्तापक्षातील नगरसेवकांसह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना गुलाबाचे फूल भेट देऊन गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेतील सत्ताधार्यांनी अकोलेकरांवर लादलेली करवाढ मागे घेण्याची मागणी करीत काँग्रेसच्यावतीने सोमवारी सत्तापक्षातील नगरसेवकांसह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना गुलाबाचे फूल भेट देऊन गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला.
मनपातील सत्ताधार्यांनी अकोलेकरांवर अतिरिक्त करवाढीचा बोजा लादला आहे. प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करताना घरातील शौचालयावर देखील कर आकारणी केली. मनपा प्रशासनाला नियमानुसार ४0 टक्क्यांपेक्षा अधिक कर आकारणी करता येत नाही. याठिकाणी मनपाने ६0 टक्के करवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सभागृहात भाजपने करवाढीचा निर्णय घेताना खुद्द सत्तापक्षातील अनेक नगरसेवकांचा करवाढीला विरोध होता. नाईलाजाने नगरसेवकांनी भाजपचा निर्णय मान्य केला. भाजपमधील अशा नगरसेवकांनी पक्षाचे सर्मथन न करता अकोलेकरांचा विचार करण्याची मागणी करीत काँग्रेसने गांधीगिरीच्या माध्यमातून भाजपाचा निषेध व्यक्त केला. सोमवारी महापालिकेत उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्यासह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह मनपा आवारातील भाजप नगरसेवकांना काँग्रेस पदाधिकार्यांनी गुलाबाचे फूल देऊन करवाढ मागे घेण्याची विनंती केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा माजी महापौर मदन भरगड, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, नगरसेवक पराग कांबळे, सुषमा निचळ, इरफान खान, मोईन खान, फिरोज खान, राजू चितलांगे, गणेश कटारे, प्रदीप वखारिया, शरद गंगासागर, नौशाद अली, अभिषेक भरगड, मकसूद खान, अफरोज लोधी आदी उपस्थित होते.