दिवसभरात ४,५५५ लाभार्थींनी घेतली कोविड लस
अकोला : जिल्ह्यात कोविड लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थींमध्ये लसीकरणाचा उत्साह दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील ४ हजार ५५५ लाभार्थींनी कोविड लस घेतली. यामध्ये ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील २,४७८, तर ६० वर्षांवरील १,८६२ लाभार्थींचा समावेश आहे. यासह २१५ इतर लाभार्थी असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
जीएमसीत डासांचा प्रादुर्भाव
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छता आणि घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाइकांना उघड्यावरच रात्र काढावी लागत असल्याने त्यांना डासांपासून धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती पाहता रुग्णालय परिसरात फवारणी करून स्वच्छता करण्याची गरज आहे.
लहान मुलांमध्ये वाढले तापाचे प्रमाण
अकोला : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला. त्याचा फटका लहान मुलांना बसला असून, अनेकांमध्ये आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणे आढळून येत आहेत. पालकांनी लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.