अकोला : सिल्वासा (दादर आणि नगर हवेली) येथे ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधित पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षा आतील मुलींच्या संघाचे प्रतिनिधीत्व करीत अकोल्यातील जागृती विद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती संघदास वानखडे हिने संघाला राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळवून दिले .अमरावती विभागाची संस्कृती वानखडे, औरंगाबाद विभागाची तनिषा बोरामणीकर, पुणे विभागाच्या आदिती वावळ व धनश्री खैरमोडे तसेच नाशिक विभागाची सिया कुळकर्णी या पाच बुद्भिबळपटू खेळाडूंची १४ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली होती. सदर खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.या स्पर्धेत एकूण सहा डाव खेळविण्यात आले आहेत. महाराष्ट्र संघाने बिहार, कर्नाटक, सी.आय.एस.सी.ई., हरियाणा, गुजरात, या पाच संघावर मात केली. तर तमिळनाडूसोबत हार पत्करावी लागली. महाराष्ट्र व तमिळनाडू या दोन्ही संघाचे गुण सारखे होते. कारण तमिळनाडूला गुजरातने मात दिली होती. परंतु टाय ब्रेक दोन नुसार तमिळनाडूला प्रथम क्रमांक मिळाला. आणि महाराष्ट्र संघाला द्वितीय क्रमांक मिळाला.संस्कृतीच्या कामगिरीबद्दल जागृती शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष शांताबाई धानोरकर, सचिव अॅड. विलास वखरे, मुख्याध्यापक अरुण लौटे, उपमुख्याध्यापक विनायक देशमुख, पर्यवेक्षक अरुण राऊत, क्रीडा शिक्षक राजेंद्र जळमकर, वर्गशिक्षिका लता पातोंड आणि शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्कृतीचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत अकोल्याच्या संस्कृतीला रौप्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 4:06 PM