अकोला : आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत महानगरातील मुलींनी गरुड झेप घेत अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर नेले. या होतकरू व हरहुन्नरी विद्यार्थिनींचे समाजाने शैक्षणिक पालकत्व स्वीकारून, अशा मुलींच्या शैक्षणिक उत्थानासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केआयटीएस एंजल टीमच्या प्रमुख व आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स ट्रेनर काजल राजवैद्य यांनी केले.
जठारपेठ येथील जैन हॉटेल येथे केआयटीएसच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी रोबोटिक्स ट्रेनर राजवैद्य व विजय भट्टड हे या मुलींच्या या अभिनव तंत्रज्ञानाची माहिती देत होते. यावेळी मनुताई कन्या शाळेच्या माजी प्राचार्या डॉ. वर्षा पाठक उपस्थित होत्या. केआयटीएस या रोबोटिक्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या प्रमुख व मेन्टोर काजल राजवैद्य यांच्या कुशल नेतृत्वात मुलींनी रोबोटिक्सचे अद्ययावत प्रशिक्षण घेत आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावून अकोल्याचे नाव गतिमान केले आहे. एकीकडे आर्थिक कमकुवत व ग्रामीण भागाचा गंध असणाऱ्या या मुली नवख्या रोबोटिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या मुलींना केआयटीएस आपल्या परीने तंत्रज्ञानाचे सहकार्य करीत आहे. समाजाने सामाजिक दायित्व ओळखून अशा गुणवंत मुलींना रोबोटिकच्या शैक्षणिक कार्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी स्पर्धेत नाव कमावणाऱ्या विद्यार्थिनी गायत्री तावरे, स्नेहल गवई, अंकिता वाजिरे, अर्पिता लंगोटे, निकिता वसतकर, रुचिका मुंडाले, सायली वाकोडे, प्रणाली इंगळे, गौरी गायकवाड, नेहा कवळकार, पूजा फुरसुले, स्वाती सरदार, सानिका काळे, आचल दाभाडे, दिया दाभाडे, गौरी झांबरे, प्रांजली सदाशिव समवेत तंत्रसहायक रुषभ राजवैद्य व पालकवर्ग उपस्थित होता.
मुलींच्या पेरणी यंत्राला ॲवॉर्ड
फर्स्ट या संस्थेने आयोजित केलेल्या फर्स्ट रोबोटिक्स स्पर्धेमध्ये भारतातून महानगरातील या मुलींची केआयटीएसचा अँजेल हा एकच चमू निवडला गेला होता. महाअंतिम फेरीमध्ये ११ देशांमधून ३ हजारपैकी उत्कृष्ट २० चमूचे आविष्कार निवडले गेले होते. गेल्या २८, २९ जूनला ही ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली. ज्यात मुलींनी बनवलेल्या पेरणी यंत्राला नावीन्यपूर्ण प्रभावशाली प्रोजेक्ट ॲवॉर्ड मिळाला.
यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे ही इच्छा
अति कष्टातून आणि जिद्दीने केआयटीएस अँजेलच्या मुलींनी शेतकरी बांधवांकरिता हे पेरणी यंत्र बनविले. ते सर्व शेतकरी वर्गापर्यंत पोहोचावे अशी त्यांची इच्छा आहे.