अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील डायलिसीस सेंटर गत काही महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णसेवा ठप्प पडली आहे. त्याचा थेट परिणाम थॅलिसिमीया व किडनीच्या रुग्णांवर होत आहे. सर्वोपचार रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध असल्या, तरी त्यांची सद्यस्थितीत अत्यंत दुरवस्था झालेली आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. अशातच येथील डायलिसीस केंद्रही बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास वर्षभरापासून येथील डायलिसीस केंद्र बंद पडले आहे. या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आहेत; परंतु डॉक्टरांअभावी येथील वैद्यकीय उपकरणे धूळ खात आहेत. सुविधा असूनही थॅलिसिमीया व किडनीच्या रुग्णांना डायलिसीससाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी रुग्णालयातील उपचारामुळे त्यांना आर्थिक फटकाही सोसावा लागत आहे.वर्ष झाले; पण तज्ज्ञ डॉक्टरच नाहीसर्वोपचार रुग्णालयात मेडिसीन विभागात केवळ तीन डॉक्टर कार्यरत आहेत. यामध्ये नेफ्रॉलॉजीस्टचे पद रिक्त आहे. नेफ्रॉलॉजीस्ट नसल्याने गत वर्षभरापासून डायलिसीस केंद्र ठप्प पडले आहे.सात वर्षांनी ईसीटी मशीनचा उपयोगसर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागामध्ये सात वर्षांपूर्वी शॉक थेरेपीसाठी ईसीटी मशीन उपलब्ध करण्यात आली होती. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर असूनही गत सात वर्षांपासून ईसीटी मशीनचा उपयोग करण्यात आला नव्हता. या संदर्भात रुग्णसेवक आशिष सावळे यांनी आॅनलाइन तक्रार केल्यानंतर जीएमसीला जाग आली. तब्बल सात वर्षांनी ही मशीन उपयोगात आणल्या गेली आहे. हाच प्रकार ‘डायलिसीस’ च्या बाबतीत होत आहे; परंतु त्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.