अकोला: गत वर्षभरापेक्षाही अधिक काळापासून प्रभारींच्या खांद्यावर असलेल्या अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास अखेर मंगळवारी नियमित अधिष्ठाता लाभले. नव्याने नियुक्त झालेले डॉ. अजय नर्मदाप्रसाद केवलिया यांनी मंगळवारी सकाळी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडून स्विकारला. पदभार स्विकारताच डॉ. केवलिया यांनी विविध विभागांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी सांभाळलेले डॉ. अजय केवलिया यांची अकोला ‘जीएमसी’चे अधिष्ठाता म्हणून त्यांच्या विनंतीनूसार बदली करण्यात आल्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सोमवारी जारी केला. त्यानूसार डॉ. केवलिया हे मंगळवारी सकाळी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश नेताम, विविध विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापकांनी डॉ. केवलीया यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. केवलिया यांनी औपचारिकरित्या डॉ. कार्यकर्ते यांच्याकडून पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर डॉ. केवलिया यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली. दुपारी महाविद्यालय परिषदेची बैठक घेऊन विविध विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापकांचा परिचय करून घेतला तसेच कामाचा आढावा घेतला.
अकोला जीएमसी हे नव्याने स्थापन झालेल्या जीएमसींपैकी बरेच पुढे आहे. डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. घोरपडे व इतर विभाग प्रमुखांनी या महाविद्यालयाची खुप प्रगती केली आहे. या सर्वांना सोबत घेऊन यापुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार आहे.
- डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.