अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाकडे हक्काची केवळ एकच रुग्ण वाहिका असून, त्यासाठी नऊ चालक कार्यरत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालक मंत्री बच्चू कडू यांनी समस्या सोडवत सर्वोपचार रुग्णालयासाठी दोन रुग्ण वाहिका मंजुर केल्या आहेत.सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण वाहिका चालक म्हणून दहा पदे भरण्यात आली होती. त्यातील एक कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याने येथे ९ कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, सर्वोपचार रुग्णालयाकडे हक्काची एकच रुग्ण वाहिका आहे. त्यामुळे एका रुग्ण वाहिकेवर केवळ एकाच चालकाची नियुक्त करणे शक्य आहे, तर इतर चालकांकडे विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली होती. विशेष म्हणजे अत्यावश्यक प्रसंगी रुग्ण वाहिका द्यायची वेळ आली, तरी रुग्ण वाहिकेची स्थिती बिकट आहे. जिल्हा नियोजन बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. शिवहरी घोरपडे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या समोर ही समस्या मांडली. यावेळी पालकमंत्री कडू यांनी दोन रुग्ण वाहिकांना मंजुरी दिली. यातील एक रुग्णवाहिका ही आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या निधीतून, तर दुसरी रुग्णवाहिका जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिली जाणार आहे.
सर्वोपचार रुग्णालयाला मिळणार दोन रुग्णवाहिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 6:21 PM