अकोला : गत वर्षभरापासून सर्वोपचार रुग्णालयात लहान मुलांच्या सलाइन्स, ताप, पोटदुखीच्या औषधांसह इतर महत्त्वाच्या इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे. मध्यंतरी हाफकीनकडून काही औषधं आणि सर्जिकल साहित्याचा पुरवठा झाला, तरी उपलब्ध औषधसाठा तीन ते चार महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा नसल्याने येथे औषध टंचाई कायम आहे. त्यामुळे खासगीतूनच औषध खरेदी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्याचा रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे.खासगी दवाखाना किंवा रुग्णालयातील महागडा उपचार परवडत नाही. म्हणून हजारो रुग्ण दररोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येतात. येथे अत्यल्प खर्चात त्यांच्यावर उपचार होत असून, नियमानुसार नि:शुल्क औषधेही दिली जातात; मात्र गत काही दिवसांपासून येथे येणारा रुग्ण उपचारानंतर थेट खासगी औषध केंद्रावर औषध खरेदी करताना दिसून येतो. या रुग्णांशी संवाद साधला असता, उपचार स्वस्तात मिळाला तरी सर्वोपचार रुग्णालयात औषधेच उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. शिवाय, उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनदेखील डॉक्टर बाहेरूनच आणायला सांगत आहेत. खासगीत उपचार परवडत नाही म्हणून सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या रुग्णांना येथेही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातर्फे चालू वर्षात हापकिन महामंडळाकडे औषधांची मागणी केली होती. मागणीपैकी केवळ १५० औषधे वर्षभरात सर्वोपचारला मिळाली आहेत. त्यातही मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याने सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा कायम आहे.या वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा
- आयव्ही सेट नाहीत
- आठ, दहा, बारा आणि १४ क्रमांकाचे फोलीस खॅफेटर नाहीत
- सीटी स्कॅन करताना उपयोगात आणले जाणारे इंजेक्शन नाहीत.
- आयसीयुमध्ये आवश्यक असलेले प्लास्टिक एअरवेज नाहीत.
- ‘ईसीजी’साठी आवश्यक चारपैकी एक ा प्रकारचा रोल नाही.
- सिजरींगसाठी आवश्यक स्पायनल निडल नाही.
हापकिनकडे केलेल्या मागणीनुसार महत्त्वाची यंत्रसामग्री, सर्जिकल साहित्य आणि औषधांचा पुरवठा अद्यापही सर्वोपचारला झाला नाही. एकूण वितरित अनुदानाच्या दहा टक्के रकमेतून टंचाईच्या काळात स्थानिक खरेदी केली जाते.- संजीव देशमुख, प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.