लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या माध्यमातून उपचार अधिक प्रभावी होतो; पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे लागोपाठ बंद पडत आहेत. सोनोग्राफी, डायलिसिसनंतर आता सीटी स्कॅन मशीनही बंद पडल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.गत काही दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील सोनोग्राफी, डायलिसिस तसेच मनोविकृती विभागातील ईईजी ही वैद्यकीय उपकरणे बंद पडल्याने शेकडो रुग्णांचे वैद्यकीय उपचार प्रभावित झाले आहेत. अशातच गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील सीटी स्कॅन मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही सेवादेखील ठप्प पडली आहे. कमी खर्चात महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येत असल्याने रुग्ण येथे येतात; मात्र लागोपाठ महत्त्वाच्या आरोग्य सुविधा ठप्प पडत असल्याने रुग्णांना खासगी यंत्रणेचा आधार घ्यावा लागत आहे. यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, यासंदर्भात चौकशी करून सांगणार असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय तपासण्या होत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना अर्धवट उपचार घेऊन माघारी परतावे लागत आहे.
रुग्णांना आर्थिक फटका!सर्वोपचार रुग्णालयातील सोनोग्राफी, डायलिसिस, ईईजी आणि आता सीटी स्कॅन मशीन बंद पडल्याने रुग्णांना खासगी यंत्रणेचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी रुग्णांना हजारो रुपयांचा फटका बसत आहे. शिवाय, योग्य वेळी वैद्यकीय तपासण्या होत नसल्याने त्यांना मानसिक त्रासदेखील सहन करावा लागत आहे.