लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गत आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वोपचार रुग्णालयाची दाणादाण उडाली आहे. रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डात अस्वच्छता अन् दुर्गंधी पसरली आहे. शिवाय, काही वॉर्डात पावसाचे पाणी शिरले, तर काही वॉर्डाच्या छताला गळती लागली आहे. ही परिस्थिती रुग्णावर उपचारापेक्षा त्यांना आजारी करण्यास जास्त पोषक ठरत आहे.जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घतल्याने दवाखाने, रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत. सर्वोपचार रुग्णालयातही हीच स्थिती आहे; पण पावसामुळे रुग्णालयाची दाणादाण उडाली आहे. काही वॉर्डाच्या छताला गळती लागली आहे, तर काही वॉर्डात चक्क पाणी साचले आहे.दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील वॉर्ड क्रमांक तीनजवळ छत कोसळल्याची घटना घडली. रुग्णालयातील ही दुसरी घटना होती, तर भिंतीला गळती लागल्याने महिला सर्जरी वॉर्ड क्र. १० मध्येही पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले.या वॉर्डाची पाहणी केली असता पावसामुळे वॉर्डात पाणी साचले असून, रात्र पाण्यातच काढावी लागल्याचे वॉर्डातील रुग्णांनी सांगितले. सफाई कर्मचारी महिलेने सकाळपासून पाणी काढण्याचा प्रयत्न केला; परंतु भिंतीमधून पाण्याला गळती लागल्याने वॉर्डात पाणी निरंतर साचू लागले. येथून बाल रुग्ण विभागाकडे जाताना उघड्यावरच खाद्यपदार्थ टाकण्यात आल्याचे आढळून आले.पावसामुळे हे खाद्यपदार्थ कुजल्याने त्याला दुर्गंधी सुटली असून, परिसरात माशांचेही प्रमाण वाढले आहे. हा प्रकार रुग्णांसह डॉक्टरांच्याही आरोग्यास हानिकारक ठरत आहे.
रुग्णांना ‘इन्फेक्शन’चा धोकासर्वोपचार रुग्णालयात साथीच्या रुग्णांसह शस्त्रक्रियेचे रुग्ण असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे; मात्र येथे रुग्णांना अस्वच्छतेत उपचार घ्यावा लागत असल्याने त्यांना ‘इन्फेक्शन’चा धोका वाढला आहे. कारवाईची जबाबदारी कोणाची? सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणे गुन्हा आहे; मात्र या ठिकाणी कायद्या मोडीत काढण्यात येत असूनही त्याकडे कोणाचे लक्ष नाही. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असताना कारवाईची जबाबदारी स्वीकारण्यास कोणीच पुढाकार घेत नसल्याचे वास्तव आहे.
उष्टे अन्नाची विल्हेवाट नाही!अन्न सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे अन्नपदार्थ उघड्यावरच टाकून दिले जातात. पावसाने हे अन्न कुजले असून, त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. विशेष म्हणजे, जवळच बालरुग्ण विभाग असून, या रुग्णांच्या आरोग्याला धोका आहे. डॉक्टरांची या ठिकाणाहून ये-जा सुरू असली तरी त्यांच्याकडूनही याप्रकरणी तक्रारी होत नाहीत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची वानवाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वर्ग चारची पदे रिक्त आहेत. त्यामुळे केवळ सकाळ आणि दुपार अशा दोन पाळ्यांमध्ये वर्ग-४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली जाते. त्यामुळे त्यांनी कितीही स्वच्छता केली, तरी तास-दीड तासांत परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येते.
‘टीबी’ वॉर्डातील रुग्ण धोक्यात सर्वोपचार रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूला क्षयरोग वॉर्ड आहे. या वॉर्डाच्या बाजूला खुला भूखंड असून, या ठिकाणी सर्वसाधारण कचºयासोबतच जैविक कचराही टाकण्यात येतो. पावसाळ्यात हा कचरा कुजल्याने त्याचा घातक परिणाम ‘टीबी’च्या रुग्णांवर होऊ शकतो.डासांचीही होत आहे उत्पत्ती सर्वाेपचार रुग्णालयात साचलेले पाणी, नाल्या डासांसोबतच माशांच्या उत्पत्तीला पोषक ठरत आहेत.४सोबतच परिसरात सडलेले नारळ, कुजलेल्या खाद्यपदार्थांमुळे माशांचे प्रमाण वाढत आहेत. ज्या ठिकाणी उपचार त्याच ठिकाणी डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोकाही वाढला आहे.