- अतुल जयस्वाल
अकोला : देशभरातील रक्तपेढींमध्ये उपलब्ध असलेल्या रक्त घटकांची माहिती आॅनलाइन मिळावी, यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरु केलेल्या ‘ई-रक्त कोष’ या राष्ट्रीय पातळीवरील ‘पोर्टल’वर आता अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीतील उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या रक्तपेढीने गत चार दिवसांपूर्वीच या पोर्टलवर रक्तपेढीकडे उपलब्ध साठ्याचे ‘अपडेट’ टाकण्यास सुरुवात केली आहे.मानवी रक्ताला कोणताही पर्याय नसल्यामुळे गंभीर आजारपण, शस्त्रक्रिया यासाठी रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्याची पूर्तता मानवी रक्तानेच करावी लागते. हवे असलेले रक्त मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी धावपळ करावी लागते. देशभरातील शासकीय व खासगी रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याची माहिती एका क्लिकवर प्राप्त व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने वर्ष २०१६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर ‘ई-रक्त कोष’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर देशभरातील रक्तपेढ्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याच्या नोंदी दैनंदिन ‘अपडेट’ करतात. सध्याच्या घडीला देशभरात खासगी व शासकीय मिळून जवळपास २७६० रक्तपेढ्या आहेत. आतापर्यंत या रक्तपेढ्यांपैकी १४५२ रक्तपेढ्यांनी ‘ई-रक्त कोष’वर त्यांच्याकडील रक्तसाठ्याची माहिती टाकणे सुरू केले आहे. या पोर्टलवर जवळची रक्तपेढी, रक्तदान शिबिरे, रक्तपेढ्या, त्यामध्ये उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्यांची रक्तगटनिहाय माहिती उपलब्ध आहे, त्यामुळे हे पोर्टल रक्ताची गरज असलेल्यांसाठी आधार ठरली आहे. या पोर्टलवर आता अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीनेही उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गरजूंना एका क्लिकवर या रक्तपेढीतील उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती मिळत आहे.‘जीएमसी’च्या संकेतस्थळावरही लवकर रक्तसाठ्याची माहितीई-रक्त कोषवर अपडेट टाकणे सुरू केल्यानंतर आता ही रक्तपेढी लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र संकेतस्थळावरही रक्तसाठ्याची माहिती टाकणे सुरू करणार आहे.महाराष्ट्रात ३०७ रक्तपेढ्या‘नॅको’च्या संकेतस्थळानुसार, राज्यात आजच्या घडीला शासकीय ८५ , स्वयंसेवी संस्थांच्या ३९, खासगी इस्पितळांच्या ८० आणि स्वतंत्र खासगी १०३ अशा एकूण ३०७ रक्तपेढ्या आहेत. यापैकी अनेक रक्तपेढ्या त्यांच्याकडे उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती ई-रक्तकोषवर टाकत नसल्याचे दिसून येत आहे. ‘जीएमसी’च्या रक्तपेढीने मात्र या पोर्टलवर माहिती टाकणे सुरू केले आहे.रक्तपेढीमध्ये उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती राष्ट्रीय पातळीवरील पोर्टलवर उपलब्ध करून दिल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. रक्ताची गरज असलेला कोणताही रुग्ण किंवा हॉस्पिटल या पोर्टलवरून माहिती घेऊन, येथील रक्ताची मागणी ‘ब्लड आॅन कॉल’ पद्धतीने नोंदवू शकतो.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.