अकोला : ‘अनलॉक-४ अंतर्गत हळूहळू सर्वच क्षेत्रे खुली करण्यात येत असताना, येत्या १२ सप्टेंबरपासून देशभरात आणखी ८० विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून, १० सप्टेंबरपासून या रेल्वेगाड्यांसाठी आरक्षण बुकींगला सुरुवात होणार आहे. या अंतर्गत अकोला रेल्वेस्थानकावरून जाणारी अहमदाबाद-पुरी ही गाडी सुरू करण्यात येणार आहे. अकोला येथून आधीच दोन विशेष गाड्या धावत असून, यामध्ये आता आणखी एका गाडीची भर पडणार आहे.कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर २३ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तथापि, देशभरात सध्या २३० विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. अनलॉक-४ अंतर्गत लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर रेल्वेनेही प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखी ८० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. १२ सप्टेंबरपासून सुरू होणार असलेल्या या ८० रेल्वेगाड्यांमध्ये ०८४०५/०६ अहदाबाद-पुरी व पुरी-पुरी अहमदाबाद ही जोडी रेल्वे अकोला मार्गे धावणार आहे. याबाबतची अधिसूचनाही रेल्वेकडून जारी करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासाला मुभा दिल्यानंतर आता अकोला स्थानकावरही विशेष रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. तथापि, या गाड्यांमधून केवळ आरक्षित तिकीटांवरच प्रवास करता येणार आहे.दर शनिवार व गुरुवारी येणार अकोला स्थानकावर०८४०५ अहमदाबाद-पुरी ही रेल्वे गाडी दर शुक्रवारी अहमदाबाद येथून प्रस्थान करणार आहे. ही रेल्वे दर शनिवारी सकाळी सहा वाजता अकोला स्थानकावर येईल. पुरी-अहमदाबाद ही गाडी दर बुधवारी पुरी येथून प्रस्थान करून दर गुरुवारी सायंकाळी ६ वा. ४० मिनीटाला अकोला रेल्वे स्थानकावर येणार आहे. याआधी अकोला रेल्वेस्थानकावरून अहमदाबाद-हावडा व मुंबई-हावडा या दोन जोडी विशेष रेल्वे गाड्या साप्ताहिक स्वरूपात धावत आहेत.अकोला-पूर्णा मार्गाची उपेक्षाचदक्षिण-मध्य रेल्वेच्या महत्त्वपूर्ण मार्गांपैकी एक असलेल्या अकोला-पूर्णा या मार्गाच्या पदरी पुन्हा उपेक्षाच आली आहे. अकोला-पूर्णा मार्गे एकही विशेष गाडी सध्या सुरू नाही. या मार्गावर अकोला-वाशिम-हिंगोली जिल्ह्याचे ठिकाण असून, दक्षिण भारतात जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे; परंतु या मार्गावर एकही विशेष गाडी नसल्यामुळे वाशिम,हिंगोलीकरांची निराशा झाली आहे.