लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वांचे अंदाज चुकवित भाजपाने स्थायी समिती सभापती पदासाठी विशाल श्रावण इंगळे यांच्या नावावर शिक्कमोर्तब करून इच्छुकांना धक्का दिला आहे. महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ १० असल्यामुळे विशाल इंगळे यांची निवड निश्चित असून, मंगळवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येईल. महापालिकेच्या आर्थिक व इतर विषयाच्या धोरणासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थायी समितीला प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदाला मानाचे स्थान आहे. त्यामुळे अनेकांनी लॉबींग केली होती. ती सर्व नावे मागे टाकून भाजपाने शहराचे भौगोलिक व राजकीयदृष्ट्या समीकरण लक्षात घेऊन दावेदार निवडला असून, विशाल श्रावण इंगळे यांनी आज अर्ज दाखल केला आहे. स्थायी समिती सभापतीकरिता भाजपचे विशाल इंगळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सोमवारी भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी विशाल श्रावण इंगळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी तीन उमेदवारी अर्ज नगरसचिव अनिल बिडवे यांच्याकडे दाखल केले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, गटनेता राहुल देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, नगरसेवक अनिल गरड, विनोद मापारी, सुभाष खंडारे, दीप मनवानी, तुषार भिरड, नगरसेविका नंदाताई पाटील, आम्रपाली उपरवट, आरती घोघलिया, रंजना विंचनकर, अर्चना मसने, जानव्ही डोंगरे, शारदा ढोरे व सर्व भाजपा नगरसेवक, नगरसेविकांची उपस्थिती होती.
निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निर्णय
शिवणी -शिवर हा परिसर भारिप- बमसंचा बालेकिल्ला मानल्या जातो. नगरसेवक विशाल इंगळे यांचे वडील श्रावण इंगळे यांना भारिपचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान केले होते. त्यानंतर याच भागातील भारिपचे पदाधिकारी दामोदर जगताप यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली होती. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांनी भाजपाची वाट धरली. खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी मनपा निवडणुकीत शिवणी-मलकापुर प्रभागातून विशाल इंगळे, दीपाली प्रवीण जगताप यांना भाजपाचे तिकीट देऊन निवडून आणले. तसेच विशाल इंगळे यांना मनपात स्थायी समितीच्या सभापती पदाची मोठी संधी बहाल केली. अर्थातच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेत्यांनी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव केल्याचे लक्षात येत असले, तरी या समीकरणांची भविष्यात बेरीज होते की वजाबाकी, याचे चित्र पुढील काळात लवकरच स्पष्ट होणार आहे.
निसटता विजय अन् सभापती पदाची लॉटरीविशाल इंगळे यांनी महापालिका निवडणुकीत प्रभाग १४ मधून अवघ्या दोन मतांनी विजय मिळविला. आयुष्यातील पहिलीच निवडणूक अटीतटीची होऊन जिंकल्यावर ते आता वर्षभरातच स्थायी समिती सभापतीपदी विराजमान होणार आहेत.