अकोला : कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरू लागली आहे. मात्र, १३ महिन्यांनंतरही मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १,०७२ जणांना जीव गमवावा लागला. यामध्ये सर्वाधिक ५४५ मृत्यू हे एकट्या अकोला शहरातील आहेत, तर ग्रामीण भागात सर्वाधिक फटका अकोट तालुक्याला बसला असून, वर्षभरात १०१ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल, २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्याच महिन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याने, अकोलेकरांच्या मनात भीती वाढत गेली. यानंतर, मृत्यूचे हे सत्र सुरूच राहिले ते आजही कायम आहे. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूचा वाढता आकडा अकोलेकरांची चिंता वाढविणारा ठरला. विशेषत: अकोला महापालिका क्षेत्रासाठी कोरोनाचे हे वर्ष मोठं आव्हानात्मक ठरले. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यापैकी ५६५ मृतक हे एकटा महापालिका क्षेत्रातील आहेत, तर ग्रामीण भागात सर्वाधिक ११९ मृत्यू हे अकोट तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मृत्यूच्या वाढत्या आलेखाची गती काही प्रमाणात मंदावली. मात्र, त्याला अद्यापही ब्रेक लागला नाही. त्यामुळे अकोलेकरांवरील संकट अजूनही कायमच आहे.
तालुकानिहाय वर्षभरातील स्थिती
क्षेत्र - मृत्यू
मनपा - ५६५
अकोला - ७८
बाळापूर - ८८
बार्शिटाकळी -६३
अकोट -११९
तेल्हारा - ४२
मूर्तिजापूर - ७३
पातूर - ५०
-----------------------
एकूण - १,०७८
ही आहेत मृत्यूची कारणे
लक्षणांकडे दुर्लक्ष करीत अनेकांनी प्रारंभीचे सहा ते सात दिवस घालविले घरगुती उपचारात.
उशिरा उपचारास सुरुवात, रुग्णांच्या शरीराने दिला नाही प्रतिसाद.
व्हेंटिलेटर न मिळाल्यानेही काहींचा मृत्यू.
ऑक्सिजनचा तुटवडाही ठरला मृत्यूस कारणीभूत.
तर मृत्यू राेखता आले असते...
कोविडच्या उपचाराचे पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेत.
पहिल्या तीन दिवसांतच उपचारास सुरुवात होणे गरजेचे.
त्यासाठी वेळेत निदान होणे आवश्यक.
उपचारास योग्य दिशा महत्त्वाची.