अकोला -जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने १३ जानेवारीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला अकोलेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर अकोलकरांचा उत्साह वाढला. त्यामध्ये आता राज्याच्या अर्थसंकल्पात मोर्णेसाठी विशेष निधीची तरतूद झाल्याने आणखी भर पडली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, राज्यातील जलस्रोतांच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या योजनेसाठी २७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याच्या घोषणेने मोर्णा स्वच्छता मोहिमेला बळ मिळाले आहे.मोर्णा नदी अकोला शहराचे वैभव आहे; परंतु मोर्णा नदीपात्रात जलकुंभी मोठ्या प्रमाणात वाढली असून, घाण कचरा साचला आहे. शहरातील सांडपाणी नदीत जात असल्याने, मोर्णा नदीत अस्वच्छता पसरली आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना व मनपा अंतर्गत सफाई कर्मचाºयांसह लोकसहभागातून १३ जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली; त्यानंतर दर शनिवारी लोकसहभागातून ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ नदीपात्राच्या दोन्ही काठावर राबविण्यात येत आहे. तसेच मोर्णा नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा ‘अॅक्शन प्लॅन’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नदी पात्राच्या परिसरात शोष खड्डे तयार करणे, नदी काठावर घाट उभारणे, एलईडी पथदिवे लावणे, वृक्षारोपण आणि उद्यानांची निर्मिती करणे इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्याची वाट न बघता, अकोलेकरांच्या लोकसहभागातून दोन वर्षात मोर्णा नदीकाठी विविध विकास कामांसह सौंदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.या सर्व कामांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये घेतल्यावर मोहिमेला अधिक बळ मिळाले. त्यामध्ये आता अर्थसंकल्पात निधीची घोषणा झाल्याने मोर्णा स्वच्छता अभियानाचा संकल्प प्रत्यक्षात येण्यास मोलाची मदत होणार आहे.सकारात्मक काम हाती घेतले, तर पाठबळ मिळतेच हा संदेश मोर्णा मिशनच्या निमित्ताने समोर आला आहे. पंतप्रधानांनी दखल घेतल्यावर सर्वांचा उत्साह वाढला होता व नव्या जोमाने हे मिशन सुरू झाले व आता अर्थसंकल्पात मदतीची घोषणा झाल्याने मोर्णा मिशन पूर्णत्वास जाण्यास विलंंब लागणार नाही. हा अकोलेकरांच्या एकजुटीचा व सकारात्मक कार्याचा गौरव आहे.- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी अकोला.