अकोला : काही दिवस दिलासा दिल्यानंतर तापमानवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, सोमवारी (दि. ९) शहराचे कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. एका दिवसात पारा १.४ अशांनी वधारला असून, सोमवारी ब्रह्मपुरी, चंद्रपूरला मागे टाकत अकोला हे विदर्भातील सर्वाधिक उष्णतामान असलेले शहर ठरले.
एप्रिल महिन्यात तापमानवाढीचे सत्र सुरू झाले होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे पारा थोडा घसरला होता. परंतु, गत तीन ते चार दिवसांपासून पारा सातत्याने वाढत आहे. रविवारी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. साेमवारी यामध्ये वाढ होऊन पारा ४५.८ अंशांवर गेला. हे या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमान ठरले. यापूर्वी २८ एप्रिल रोजी ४५.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी ऊन-सावलीचा खेळ सुरू असतानाही प्रचंड उष्णतामान जाणवत होते. दिवसभर उष्ण व कोरडे वारे वाहत होते, त्यामुळे अकोलेकरांना तप्त झळांचा मारा सहन करावा लागला.
विदर्भातील प्रमुख शहरांचे तापमान
शहर तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला : ४५.८
ब्रह्मपुरी : ४४.२
वर्धा : ४४.०
यवतमाळ : ४४.७
अमरावती : ४३.४
नागपूर : ४३.२
चंद्रपूर : ४२.४
गोंदिया : ४३.२
वाशिम : ४३.५
गडचिरोली : ४०.२
बुलडाणा : ४२.०
यवतमाळ : ४३.५