लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/मानोरा: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकर्यांनी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. वासुदेव रामकृष्ण थोटे असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. मृतक वासुदेव थोटे यांच्याकडे सहा एकर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७0 ते ८0 हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. अपेक्षित उत्पन्न न झाल्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढतच होता. यावर्षीही दुबार पेरणीचे संकट असल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी शनिवारी शेतातील गोठय़ामध्ये गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविला. थोटे यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, पत्नी, जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे. याविषयी माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेऊन दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी पुढील तपास बोरगावमंजू पोलीस करीत आहेत. दुसर्या घटनेत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मौजे जगदंबा नगर (हळदा) येथील अल्पभूधारक शेतकरी राजेश भगवान जाधव (वय ३५ वर्षे) यांनी वाढत्या कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. २३ जून रोजी यवतमाळ येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मृतक शेतकरी जाधव यांच्या नावे जगदंबानगर शिवारात ४ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेच्या गिरोली शाखेचे ५0 हजार रुपये थकीत कर्ज आहे. यासह सावकारी कर्ज, नातलगांकडून घेतलेले उसने पैसे आदी कारणांमुळे ते सतत चिंतातुर राहायचे, असे मृतकाच्या पत्नीने सांगितले. २२ जून रोजी नित्यनेमाप्रमाणे शेतात गेल्यानंतर तेथेच जाधव यांनी कीटकनाशक प्राशन केले. ही बाब कुटुंबीयास कळताच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता यवतमाळकडे रवानगी करण्यात आली; मात्र उपचारादरम्यान २३ जून रोजी मृत्यूशी झुंज देताना शेतकरी जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
अकोला, मानो-यात शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 8:04 AM