अकोला: सामान्य लोकांमध्ये वाहतूक व रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी व त्या माध्यमातून अपघातांच्या प्रमाणात घट होऊन जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षी सदर सप्ताह ११ जानेवारी ते १७ जानेवारीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. त्यानुंषगाने अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा सप्ताहाची शनिवारी सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी व पालकांनी रॅली काढली असून, या रॅलीला गजानन शेळके यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. सदर रॅलीमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वप्रथम पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व विशद करून भारतात दरवर्षी दीड लाखांच्यावर लोक रस्ते अपघातात मरण पावत असल्याची माहिती दिली. प्रत्येक तासात भारतात अपघातात १७ लोक आपला जीव गमावतात. स्वातंत्र्योत्तर भारतात आजपावेतो युद्ध, रोगराई, नैसर्गिक आपत्ती यामध्ये जेवढी जीवितहानी झाली नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त जीवितहानी रस्ते अपघातातून झाल्याचे शेळके यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने सावधगिरी बाळगून वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. प्रमुख मार्गावरून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थी व पालकांच्या हातामध्ये अपघात टाळण्यासाठी आवश्यक बाबी अधोरेखित करणारे घोषवाक्य लिहिलेले बॅनर्स व फलक होते. यावेळी नीता तलरेजा, मुख्याध्यापिका संगीता धनुका, प्रशासकीय अधिकारी चेतन सोने, स्पोर्ट प्रभारी ब्रिजेश नायर, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सप्ताहभर शहर वाहतूक शाखेतर्फे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम व धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.