लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये झालेली विकास कामे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे, निवासी शाळांमध्ये भेट देत विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने गुरुवारी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणीची माहिती घेतली. यावेळी आढळलेल्या त्रुटीसंदर्भात उद्या शुक्रवारी संबंधित अधिकार्यांची साक्ष घेतली जाणार आहे. समितीचे प्रमुख आमदार हरीश पिंपळे, समितीचे सदस्य आमदार सर्वश्री लखन मलिक, ज्ञानराज चौगुले, गौतम चाबुकस्वार, प्रकाश गजभिये, प्रा. जोगेंद्र कवाडे आदींसह समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने उपस्थित होते. समितीच्या ठरलेल्या दौर्यानुसार जिल्हय़ातील मागासवर्गीय शासकीय अनुदानित शाळा, वसतिगृहे, शासन तसेच जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या कामांना भेट देण्यात आली. त्यामध्ये अकोला पंचायत समितीमधील ग्रामपंचायत पैलपाडा, ग्रामपंचायत बोरगाव मंजू येथील दलित वस्ती, विशेष घटक योजनेतून झालेल्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथील समाजकल्याण विभागाची अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळतो की नाही, याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून माहिती घेण्यात आली. त्यानंतर मूर्तिजापुरातील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात भेट देण्यात आली. तेथील भोजन कक्ष, भांडार कक्ष व ग्रंथालय तसेच पिण्याची पाण्याच्या व्यवस्थेची समिती सदस्यांनी पाहणी केली. पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटींसंदर्भात उद्या शुक्रवारी अधिकार्यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
अनेक विभागांचा आज समितीकडून आढावाशुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आढावा बैठक होणार आहे. त्यामध्ये गुरुवारी पाहणी केलेल्या अनुदानित शाळा, वसतिगृहे, विकास कामांतील त्रुटीसंदर्भात विचारणा केली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महानगरपालिका, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) या कार्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष याबाबत अधिकार्यांशी चर्चा होणार आहे.