- सचिन राऊत अकोला - बाळापुर तालुक्यातील मानकी येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने वडिलांच्या अंगावर गरम तेल ओतल्याने वडील गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुलगी प्रतीभा पांडे हीला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.प्रतीभा गणेश पांडे हीचे पतीसाेबत पटत नसल्याने ती माहेरी वडीलांकडे राहत हाेती. घर बांधण्याच्या कारणावरुन वडील महादेव सिताराम साेनाेने व मुलगी प्रतीभा पांडे यांचे वाद हाेत असायचे. अशातच २२ फेब्रुवारी २०२२ राेजी त्यांच्यातील वाद विकाेपाला गेल्याने मुलीने साेयाबीनचे तेल गरम करून वडील झाेपलेले असतांना त्यांच्या अंगावर ओतले. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या महादेव साेनाेने यांना ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.
मुलगी तेल ओतून पळून जात असतांना महादेव साेनाेने यांना दिसल्याने त्यांनी या प्रकरणाची माहीती पाेलिसांना दिली. यावरुन बाळापूर पाेलिसांनी प्रतीभा पांडे हीच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पीएसआय भाष्कर तायडे यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने पाच साक्षीदार तपासल्यानंतर समाेर आलेल्या ठाेस पुराव्यांच्या आधारे आराेपी प्रतीभा पांडे यांना दाेषी ठरवीत कलम ३२४ अन्वये दाेन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अॅड आशीष आर. फुंडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयात पाेलिस कर्मचारी रेखा हाताेलकर व संताेष उंबरकर यांनी सहकार्य केले.