- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत थांबायला तयार नाही. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाला पर्याय शोधावा, असे समोर आल्यावर हा मार्ग बुलडाण्यातून नेण्यासाठी राजकीय आंदोलन उभे राहिले दुसरीकडे या मार्गावरील अकोटपर्यंतचा टप्पा पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यायी मार्गाची पाठराखण केल्याने हा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असतानाच आता या मुद्याचे राजकीयकरण होत असल्याचे दिसत आहे.अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलोमीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने पर्यावरणप्रेमींचा या मार्गाला विरोध होत आहे. मेळघाटमधून जाणारा प्रस्तावित मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम असून, त्याऐवजी पर्यायी मार्ग व्यापक लोकहिताचा असल्याचा रेटा राज्य शासनाकडे सुरू असून, न्यायालयातही याचिका दाखल आहेत. याच सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यवर्ती समितीकडे सध्या प्रकरण सोपविलेले आहे. या पृष्ठभूमीवर १५ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्र लिहून अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर पर्यावरणवाद्यांसह बुलडाणा जिल्हा वासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या मागणीचा मिळेल त्या व्यासपीठावरून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे तर दुसरीकडे तेल्हारा तालुक्यातूनही हा रेल्वेमार्ग अकोला, हिवरखेड, तेल्हारा येथून पुढे संग्रामपूर, जळगाव जामोद येथून खंडवा येथे नेण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. तिकडे मेळघाटातही या मुद्यावर राजकारण तापले आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांकरिता ही रेल्वे महत्त्वाची असून, हा मार्ग पूर्ववत ठेवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. या मागणीसाठी भाजपाने पुढाकार घेतला असून, स्वातंत्र्यदिनी मेळघाटातील गावांमध्ये ग्रामपंचयातीने या मार्गासाठी ठराव केले आहेत.
भाजपाविरुद्धशिवसेना असा रंग येणार!अकोला ते खंडवा हा बहुप्रतीक्षित मार्ग पूर्ण व्हावा यासाठी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सातत्याने पुढाकार घेतला. या मार्गावर धावलेल्या अखेरच्या रेल्वेमध्ये प्रवास करून त्यांनी त्यांच्यासाठी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले होते. सध्या पर्यावरणाच्या मुद्यावर एकीकडे न्यायालयात याचिका दाखल असताना राजकीय वातावरणही तापले आहे. या पृष्ठभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाने आहे तोच मार्ग ही भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे, तर बुलडाण्यात सेनेचे खासदार असल्याने ते पर्याय मार्गाचे समर्थक आहेत, त्यामुळे या मुद्दाला भाजपा विरुद्ध शिवसेना असा रंग येण्याची चिन्हे आहेत.