लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पातून प्रस्तावित असलेल्या रेल्वे मार्गाची परवानगी सीआयसी (सेंट्रल इन्व्हरमेंट कमिटी)ने नाकारल्याने अकोला-खंडवा रुंदीकरणाचे काम पुन्हा रखडण्याचे संकेत आहेत. व्याघ्र प्रकल्पाऐवजी रेल्वे रुंदीकरणाचा ट्रॅक वळविला गेला, तर चार रेल्वेस्थानक रद्द होतील. सोबतच दोन नवीन रेल्वेस्थानकांची निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे या मार्गाचे भविष्य पुन्हा अंधारले आहे. आता दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासन याप्रकरणी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.पर्यावरणाचा समतोल राखावा आणि वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयांतर्गत गठित केलेली केंद्रीय पर्यावरण समितीची (सीईसी) चमू मेळघाटात ११ फेब्रुवारीपासून तीन दिवस राहून गेली. अकोला-खंडवाचा रेल्वे आणि धारणी-अमरावती या प्रस्तावित नव्या मार्गामुळे परिसरातील व्याघ्र प्रकल्पास धोका आहे का, याची शहानिशा करण्यासाठी ही तज्ज्ञ समिती अभ्यास करून गेली. वन विभाग आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखित ही केंद्रीय पर्यावरण समिती कार्यरत असते.वन विभागातून जाणाऱ्या फेब्रिक आॅप्टिक केबल, मोबाइल टॉवर्स, विद्युत प्रवाहित तार, विजेचे खांब, रेल्वे मार्ग, टायर रोड याबाबतचाही समिती सखोल अभ्यास करीत असते. या समितीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून प्रस्तावित असलेल्या अकोला-खंडवा रुंदीकरणाच्या रेल्वे मार्गाची परवानगी नाकारली आहे. चिखलदरा, धारगड-शहानूर, धारणी आणि परिसरात भटकंती करून या समितीने आपला शेरा दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याआधीदेखील समितीने परवानगी नाकारल्याने मार्गांचे रुंदीकरण रखडले होते.व्याघ्र प्रकल्पाबाहेरच्या वळण मार्गासाठी याचिकामेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेरून वळण मार्ग काढण्यात यावा, यासाठी नागपूरच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. सिमेंट रस्ते आणि रेल्वे मार्गांमुळे वन्यजीवांचे चक्र बदलून जाईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. दोन्ही मार्ग व्याघ्र प्रकल्पाबाहेरून न्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्याची आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने ही परवागनी नाकारल्याचे बोलले जाते.
५०० कोटी रु पयांचा अतिरिक्त खर्चअकोला-खंडवा हा मार्ग बुलडाण्यातील सोनाळा आणि जळगाव जामोद तालुक्यातून गेल्यास सोनाळा व जळगाव जामोद अशा दोन नवीन रेल्वेस्थानकांची निर्मिती करावी लागणार आहे आणि ३० किलोमीटरचे अंतर वाढणार आहे. तसेच डोंगरातून ६.५ किलोमीटरचा भुयारी मार्ग तयार करावा लागणार आहे. यासाठी जवळपास ५०० कोटी रु पयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे.
तर चार रेल्वेस्थानक बंद होतीलजर व्याघ्र प्रकल्पास वेढा घालून वळण मार्ग काढला गेला, तर डाबका, धूळघाट, वानरोड आणि हिवरखेड ही चार रेल्वेस्थानक नामशेष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या संदर्भात कोणता निर्णय होतो याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
अर्थवर्कसाठी ४० कोटीचा निधीरेल्वे संपर्क कॉरिडॉरच्या अर्थवर्कसाठी अकोला ते ढोण मार्गाच्या रुंदीकरण आणि विद्युतीकरणासाठी सहा हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ४० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. अकोला-पूर्णा दरम्यान कामास सुरुवातदेखील झाली आहे. परभणी-पूर्णा-नांदेड मुदखेड दरम्यान ८१ किमीचा मार्ग पूर्ण झाला असून, हा मार्ग लवकरच सुरू केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.