लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत अनेक वर्षांपासून रखडलेला अकोला-खंडवा गेज परिवर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातूनच जाऊ द्यावा, असे केंद्र सरकारला वाटत असून, राज्य सरकारने यासाठी सुचविलेल्या पर्यायी मार्गाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याची माहिती आहे.रखडलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्याच्या उद्देशाने मंगळवार, ७ जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली. या बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचा मुद्दाही चर्चिल्या गेल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने २५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव परत पाठवून यावर सूचना मागविल्या होत्या; परंतु राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी मंत्र्यांना सांगितले. यावर तिन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकाºयांनी केंद्रीय मंत्र्यांच्या नाराजीबाबत महाराष्ट्र सरकारला कळविले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा असलेला अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम सुरू आहे. अकोला ते अकोट- ४३ किमी, अकोट ते अमला खुर्द - ७७ किमी, अमला खुर्द ते खंडवा- ५४ किमी अशा तीन टप्प्यांमध्ये हे काम होत आहे. अकोला - अकोट दरम्यानचे काम पूर्णत्वास आले आहे; परंतु अकोट ते आमला खुर्द हा ३५ किलो मीटरचा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी १८ किलो मीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्यामुळे या भागातून गेज परिवर्तनाला पर्यावरणवादी व विविध संस्थांकडून विरोध होत असून, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. जैवविविधतेचा ºहास होऊ नये म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेरून रेल्वे मार्ग न्यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.व्याघ्र प्रकल्पाबाहेरून नेल्यास या प्रकल्पाची लांबी २९ किलो मीटरने वाढणार असून, भूसंपादन व इतर खर्च धरल्यास या प्रकल्पाची किंमतही वाढणार आहे. बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही मार्च महिन्यात अकोला-खांडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नेण्यास विरोध करत पर्यायी मार्गाचा विचार व्हावा,असे मत व्यक्त केले होते.