लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोला ते खंडवा गेज परिवर्तनाचे काम मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या मीटरगेज मार्गावर न करता त्यासाठी या अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेबाबत समाधान व्यक्त करून राज्य वन्य जीव मंडळानेही या भूमिकेची पाठराखण केली आहे.राज्य वन्य जीव मंडळाची शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र अधिवासासह अभयारण्यांच्या अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलोमीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने ब्रॉडगेज परिवर्तनाच्या कामाचा कधीही भरून न निघणारा परिणाम आधीच नामशेष होत असलेल्या वाघ व त्यांच्या अधिवासावर होईल. ही चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे हा मार्ग मेळघाटाबाहेरूनच घ्यावा, अशी भूमिकाही राज्य वन्य जीव मंडळाने मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीकेंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना एका पत्राद्वारे महाराष्ट्राची हीच भावना असल्याचे कळविल्याबद्दल वन्य जीव मंडळाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्याचे अभिनंदन केले. या बैठकीला वनमंत्री संजय राठोड, वन्य जीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, यादव तरटे-पाटील आदी उपस्थित होते.
जंगल वाचल्यामुळे वाघांच्या संरक्षणासोबतच मानवाचेही रक्षण होणार आहे. अकोला-खंडवा गेज परिवर्तनासाठी पर्यायी व्यवस्था शक्य आहे. त्यामुळे हा मार्ग मेळघाटाबाहेरून नेणेच योग्य असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले.- यादव तरटे पाटीलसदस्य, राज्य वन्य जीव मंडळ