अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ( नरेगा ) अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामे करण्यास गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. गेल्या १२ दिवसांपासून अधिकाऱ्यांनी ‘नरेगा’ कामांवर बहिष्कार टाकल्याने, जिल्ह्यातील ‘नरेगा’ अंतर्गत कामे ठप्प झाली आहेत. त्यामध्ये कामांवरील मजुरांना मजुरी मिळत नसल्याने, तापत्या उन्हात झाडांना पाणी देण्यासह वृक्ष संगोपनाची कामेही थांबली आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि यंत्रणास्तरावर कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत स्तरावरील मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतात. या कामांची अंमलबजावणी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदमार्फत केली जाते; परंतु पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (नरेगा) आदींसह महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी गेल्या ११ एप्रिलपासून ‘नरेगा’ची कामे करण्यास नकार दिला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांचा बहिष्कार असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या १२ दिवसांपासून जिल्ह्यात ‘नरेगा’ अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामे ठप्प झाली आहेत. त्यामध्ये ‘नरेगा’ची कामे करणाऱ्या मजुरांच्या मजुरी मस्टरवर संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून (बीडीओ) स्वाक्षरी केली जात नसल्याने, मजुरांना मजुरी मिळणे बंद झाले. केलेल्या कामाची मजुरी मिळत नसल्याने मजुरांनी काम करणे बंद केले आहे. त्यामध्ये तीन वर्षांपूर्वी वृक्ष लागवडीमध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची कामे ठप्प झाली असून, तापत्या उन्हात झाडांना जगविण्यासाठी पाणी देण्याचे कामही बंद पडले आहे.पाणी देणे बंद; झाडे कोमेजू लागली !‘नरेगा’ अंतर्गत दरवर्षी करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीत लावण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी तीन वर्षे वृक्ष संवर्धनाची कामे केली जातात. त्यामध्ये झाडांना पाणी देणे, झाडाच्या अवती भोवती असलेले गवत, काडीकचरा साफ करणे, काटेरी कुंपण घेणे आदी कामे मजुरांकडून केली जातात; परंतु गेल्या १२ दिवसांपासून मजुरी मिळत नसल्याने ही कामे ठप्प झाली. त्यामध्ये जीवाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या दिवसांत झाडांना पाणी देण्याचे काम बंद पडल्याने, जिल्ह्यातील विविध भागात लावण्यात आलेली झाडे रखरखत्या उन्हात आता कोमेजण्याच्या मार्गावर आहेत.