लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या बाजूने तपास करून, त्याची सुटका होईल या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, पुरुष उपनिरीक्षक गणेश कोथळकर व मध्यस्थी करणारा विधिज्ञ सचिन वानखडे हे तिघेजण अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात अडकले. मूर्तिजापूर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शिक्षण संस्थाचालकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. यावरून मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात २ जानेवारी रोजी सदर युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण दडवून ठेवले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या बलात्कार प्रकरणाचा तपास पीएसआय अश्विनी गायकवाड, पीएसआय गणेश कोथळकर यांच्याकडे असताना त्यांनी आरोपीला तपासात सहकार्य करण्यासाठी तसेच आरोपीला लाभ मिळेल, या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी अँड. सचिन वानखडे याच्या माध्यमातून २0 जानेवारी रोजी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने २३ जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यानंतर २५ जानेवारी रोजी पुन्हा पडताळणी केली असता यामध्ये तीनही आरोपींनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सोमवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी मूर्तिजापूर गाठून आरोपी अश्विनी गायकवाड, गणेश कोथळकर व अँड. सचिन वानखडे या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या लाचखोरीच्या प्रकरणामुळे मूर्तिजापूर पोलीस ठाण्याचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटला असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे, तर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवरही या प्रकारामुळे संशयाची सुई निर्माण होत असल्याची माहिती आहे.
अधिकारी-विधिज्ञांची मिलीभगततक्रारकर्ता तयार करणे तसेच ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, त्याला घाबरून देत प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी जिल्हय़ातील काहीविधिज्ञ कुप्रसिद्ध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही विधिज्ञांनी अशाप्रकारे दलालीचेच काम सुरू केल्याचे मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारावरून स्पष्ट होत आहे.