अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अकोला शहर व जिल्ह्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाही केला आहे. शनिवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊनला नागरिक व व्यापाºयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने व काही पेट्रोलपंपाचा अपवाद वगळता सर्वत्र बंद असल्याने बाजारपेठा व रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.पश्चिम विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात कोरोनाचे आतापर्यंत २०६१ रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत १०० जणांचा बळी गेला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यात १८ ते २० जुलै दरम्यान तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची अंमलबजावणी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजतापासूनच सुरु झाली असून, शनिवारी पहिल्या दिवशी अकोला शहरातील सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. संचारबंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट आहे. अकोला शहरातील वर्दळीचे समजले जाणारे गांधी मार्ग, टिळक मार्ग, नेकलेस रोड टॉवर चौक, सीटी कोतवाली चौक, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाइन चौक, जठारपेठ चौक या भागांमध्ये शनिवारी सकाळपासूनच कमालीची शांतता दिसून आली. एखाद-दुसºया वाहनांचा अपवाद वगळता शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.
पोलिसांचा चोख बंदोबस्तलॉकडाऊनची अंमलबजावणी चोखपणे व्हावी यासाठी शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरणाºयांवर पोलिस करडी नजर ठेऊन आहेत. येणाºया-जाणाºयांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
तालुक्यांमध्ये कडकडीत बंदकोरोनाचे रुग्ण जिल्हाभरात आढळून येत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच तीन दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शनिवारपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनला अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर शहरांमध्येही लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला आहे. बाजारपेठा बंद असून, रस्ते सामसुम झाल्याचे चित्र आहे.