- आशिष गावंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण ठेवत विविध योजनांची पूर्तता केली. मोदींवरील दृढविश्वासामुळेच यंदा मतदारांनी आमच्या पारड्यात गतवेळीपेक्षाही अधिक मतांचे भरभरून दान दिले आहे. निवडणुकीत भाजप-शिवसेना, रिपाइंसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केल्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे भाजपचे उमेदवार खासदार अॅड. संजय धोत्रे यांनी सांगितले.प्रश्न : यंदाच्या निवडणुकीत कशाचे आव्हान होते?उत्तर : निवडणूक कोणतीही असो, ती धैर्य आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास, निष्ठेने सामोरे जा यश तुमचेच राहील. जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालण्यापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिल्यामुळे यापूर्वीही कधी निवडणुकीत कोणाचे आव्हान नव्हते.प्रश्न : वाढीव मतदानाचा फायदा झाला असे वाटते का?उत्तर : नक्कीच फायदा झाला. यंदा १ लाख ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज रोजी सुशिक्षित युवक-युवतींना समाजहितासोबतच देशहित महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळेच वाढीव नवीन मतदारांची सर्वाधिक मते ही भाजपाच्या पारड्यात पडली आहेत.प्रश्न :कोणत्या मुद्यांना प्राधान्य देणार आहात?उत्तर : २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विकास कामांना सुरुवात झाली, हे विसरता येणार नाही. या कालावधीत जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती दिली असून, ते पूर्ण होतील, हा विश्वास आहे. येत्या काळात सिंचनासह प्रामुख्याने रस्त्यांची समस्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.प्रश्न : मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची अपेक्षा आहे का?उत्तर : मी कधीही पदाच्या लालसेने काम केले नाही. जिल्ह्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा प्रामाणिकपणे विस्तार केला. संघटन बांधणी केली. सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते जोडले. याची अनेकांना जाणीव आहे. केंद्र व राज्यात सत्ता नसतानाही जिल्हावासीयांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना सातत्याने विजयी केले. योग्यतेपेक्षा जास्त काही मिळू नये, असे मला वाटते. जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो पक्ष नेतृत्व घेईल.
अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांना समर्पित - खासदार अॅड. संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:27 PM