गव्हाणकर यांच्यासह दोन अपक्षांची माघार; अकोला मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात
By संतोष येलकर | Published: April 8, 2024 08:12 PM2024-04-08T20:12:25+5:302024-04-08T20:13:08+5:30
लोकसभा निवडणूक: लढतीचे चित्र स्पष्ट; प्रचाराची धामधूम सुरु
अकोला: लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सोमवार ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने, १५ उमेदवार रिंगणात उतरले असून लढतीचे चित्र स्पष्ट झाले. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह समर्थक कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात प्रचारकार्याची धामधूमही सुरु झाली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत ५ एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते आणि १७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नारायणराव गव्हाणकर आणि अपक्ष गजानन दोड या दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले.
निवडणूक रिंगणातील असे आहेत १५ उमेदवार
रिगणातील उमेदवारांमध्ये अनुप धोत्रे (भारतीय जनता पार्टी),ॲड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), मुरलीधर पवार (अपक्ष), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष), धर्मेंद्र कोठारी (अपक्ष), अशोक थोरात (अपक्ष), रत्नदीप गणोजे (अपक्ष), डाॅ. अभय पाटील(भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस), काशीनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी), शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लीग), प्रीती सदाशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल), बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), रविकांत अढाऊ (जय विदर्भ पार्टी), दिलीप म्हैसने (अपक्ष), ॲड. उज्ज्वला राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांचा समावेश आहे.
उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप !
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हा वाटपाची प्रक्रिया सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पूर्ण करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, निवडणूक निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांच्यासह उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रचाराची धामधूम सुरु !
चिन्हांचे वाटप झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह, कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात निवडणूक प्रचार कार्याची धामधूम सुरु झाल्याचे चित्र आहे.