- रवी दामोदर
अकोला - जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमधून बियाण्यांचे लिंकींग सुरू असून, याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करीत शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्त्वात बुधवार, दि. २१ शिवसैनिकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक देत निवेदन दिले.
जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढणार असून, बियाण्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. असे असताना बाजारात कपाशीचे बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन अवगत केले, मात्र याकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करीत शिवसेना (ठाकरे)गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य गोपाल दातकर, राहूल कराळे, संजय भांबेरे, मंगेश काळे, अतूल पवनीकर, गजानन बोराडे, योगेश गिते, अविनाश मोरे, राजदीप टोहरे, किरण ठाकरे, अक्षय नागदेवे, ललीत पांडे, खुशाल राऊत, गजानन पुंडकर, सतीष भातकर आदी उपस्थित होते.
...अन्यथा जिल्हाभर आंदोलनजिल्ह्यात कपाशी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, कृषी सेवा केंद्रांमधून बियाण्यांचे लिंकींग सुरू आहे. याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ कपाशीचे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. याकडे दुर्लक्ष केल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, याप्रसंगी निवेदनातून देण्यात आला आहे.