अकोला: महानगरपालिका हद्दवाढीला २४ गावांचा विरोध आहे. त्यामुळे हद्दवाढ विरोधात कृती समितीने 'एल्गार' पुकारला असून, हद्दवाढीला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवार, १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मनपा हद्दवाढ कृती समितीच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. मनपा हद्दवाढीला २४ गावांचा आणि शेतकर्यांचा विरोध आहे. शहरात रस्ते, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्या असून, हद्दवाढीमध्ये २४ गावांचा समावेश झाल्यास ८ ते १0 टक्के कराचा बोझा ग्रामीण भागातील जनतेला सहन करावा लागणार आहे. त्यामध्ये सामान्य कर, रस्ता कर, अग्निशमन कर, शिक्षण, पाणी, साफसफाई अशा अनेक करात वाढ होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना विविध कामांसाठी दुरून येऊन मनपामध्ये चकरा माराव्या लागणार आहेत. त्यामुळे ग्रामीण, शहरी जनता व शेतकर्यांचा विरोध असूनही हद्दवाढीचा अट्टहास का, असा प्रश्न माजी आमदार हरिदास भदे यांनी यावेळी उपस्थित केला. शहरातील पाणी व अन्य इतर सुविधा कोणत्याही गावाला मिळत नाहीत, त्यामुळे यासंदर्भात करण्यात येणारा दावा चुकीचा असून, मनपा हद्दवाढीला विरोध दर्शविण्यासाठी कृती समितीच्यावतीने १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगितले. महसुलात वाढ करण्यासाठी मनपा हद्दवाढीचा डाव असून, करवाढीसाठी हद्दवाढीचे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव श्रीकांत पिसे पाटील यांनी यावेळी केला.
अकोला मनपा हद्दवाढीला विरोध; उद्या मोर्चा!
By admin | Published: April 11, 2016 1:31 AM