- आशिष गावंडे अकाेला - जुने शहर पाेलिस स्टेशनवर महिलांचा माेर्चा काढून सामाजिक सलाेखा बिघडविणे व एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी जुने शहर पाेलिसांनी गुरुवारी पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. दरम्यान, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेकळे यांनी शहरात दाखल हाेत हरिहरपेठ परिसराची पाहणी करुन दाेषींवर कठाेर कारवाइ करण्याचे निर्देश दिले.
करण साहू, सोनु साहू, राज यादव, गुंजन कावळे व गजु मॅकनिकल सर्व राहणार हरिहरपेठ अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. जुने शहरातील हरिहरपेठ, चाॅंदखा प्लाॅट,हमजा प्लाॅट, शिवसेना वसाहतमधील अंबिका नगर, दुर्गा चाैक परिसरात ७ ऑक्टाेबर राेजी दाेन समुदायात तुफान दगडफेक हाेऊन वाहनांची जाळपाेळ करण्यात आली हाेती. या प्रकरणी भाजप लाेकप्रतिनिधींनी दाेन्ही समुदायातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर प्रकरण निवळले हाेते. अचानक ९ ऑक्टाेबर राेजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उपराेक्त आराेपींनी महिलांना एकत्र करत जुने शहर पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढला. हा मोर्चा परत जात असताना मोर्चात सहभागी काही युवकांनी हरिहरपेठ येथून दुचाकीने जाणाऱ्या माे. शेख जमीर शेख उमर यांना बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली हाेती. फिर्यादी शेख जमीर यांच्या तक्रारीनुसार जुने शहर पाेलिसांनी करण साहू व त्याच्या इतर चार साथीदारांविराेधात बीएनएस कलम १८९(२), १९१(२), १९०, १९६(१), २९६, ११८ (१) नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना बेड्या ठाेकल्या. तसेच पाेलिस स्टेशनमध्ये विनापरवाना माेर्चा आणनाऱ्या करण साहू व माेर्चात सहभागी झालेल्यांविरूदध बीएनएस कलम २२१,२२३ तसेच १३५ मुपोअ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाेषींची हयगय करु नका!सणासुदीचे दिवस लक्षात घेता शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी समाजकंटकांविराेधात कठाेर भूमिका घेण्याचे निर्देश विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेकळे यांनी पाेलिस प्रशासनाला दिले. दाेषी काेणीही असाे, त्याची हयगय न करता गुन्हे दाखल करण्याची सूचना रामनाथ पाेकळे यांनी केली. पाेकळे यांनी हरिहरपेठ परिसराचा आढावा घेतल्यानंतर ते दुपारी अकाेटकडे रवाना झाले. त्याठिकाणी ११ ऑक्टाेबर राेजी पार पडणाऱ्या नवदुर्गा उत्सव सांगता मिरवणुकीचा त्यांनी आढावा घेतला.
‘एलसीबी’तील २१ जणांचे पथक मागावरजुने शहर पाेलिसांनी करण साहू, सोनु साहू, राज यादव, गुंजन कावळे व गजु मॅकनिकल यांच्या विराेधात गुन्हा दाखल करताच करण साहू व गुंजन कावळे ९ ऑक्टाेबरच्या रात्री पासून फरार हाेते. त्यांच्या शाेधासाठी ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांच्यासह २१ जणांचे पथक मागावर हाेते. यातील कावळे याला अटक केल्यानंतर दुपारी घरी माेटरसायकल घेण्यासाठी आलेल्या करण साहू याला पथकाने अटक केली.