- संजय खांडेकर (अकोला)
गेल्यावर्षी तुरीचे बम्पर पीक आल्याने तूर खरेदीचा मोठा प्रश्न शासनासमोर उभा ठाकला होता. या तूर खरेदीत घोटाळेही झाले. अकोल्याच्या बार्शिटाकळी तालुक्यातील खरेदी-विक्री संस्थेने याच तूर खरेदीत घोटाळा केल्याचे समोर आल्यामुळे मंगळवार, दि.१३ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने ही खरेदी-विक्री संस्था बरखास्त केली अन् १४ नोव्हेंबर रोजी अकोल्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी करण्याचा आदेश दिला. या प्रकारामुळे तूर व तुरीची खरेदी याची चर्चा बाजारात होत असतानाच आता तुरीच्या तेजीमुळेही बाजार उंचावला आहे. तुरीचे भाव ३,५०० क्विंटलवरून थेट ४,५०० पर्यंत पोहोचला आहे.
अकोल्याच्या बाजारपेठेत गत आठवडाभरात तुरीचा भाव चक्क नऊशे रुपयांनी वधारला असून, आता ही तूर प्रतिक्विं टल पाच हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. हरभरा, उडीद व मूग, अशा सर्वच डाळ वाणांनी तेजीच्या मार्गावर प्रवास सुरू केला असल्यामुळे सामान्यांना आपले बजेट नव्याने तयार करावे लागणार आहेत. दुसरीकडे या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना कमी अन् व्यापाऱ्यांना जास्त होत असल्यामुळे भावासंदर्भात तुरीने शेतकऱ्यांच्या हातावर आताही तुरीच दिल्या आहेत. अजून या हंगामातील तूर बाजारात आली नाही. शेतकऱ्यांची तूर बाजारात येईपर्यंत तुरीचा भाव वाढताच राहिला, तरच शेतकऱ्यांना फायदा होईल.
यंदा तुरीचा पेरा कमी झाला. सोबतच नाफेडने ३० लाख पोती तूर डाळ विकली. पावसाचा खंड तर कुठे दुष्काळाचा तडाखा यामुळे तुरीचे उत्पादन कमी येण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत भावाची सापशिडी कोणाला फायदेशीर ठरेल, याच्या गप्पा अकोल्याच्या बाजारपेठेत रंगताना दिसत आहेत. अकोला हे तूर डाळ उद्योगाचे हब आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल दीडशे डाळ उद्योग आहेत. या उद्योगांना सध्या तुरीच्या वाढत्या भावामुळे उभारी मिळत आहे. अकोल्याची तूर डाळ उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेशासह कोलकातापर्यंत जाते. रेल्वे वॅगन आणि दररोजचे अनेक ट्रक एमआयडीसीतून रवाना होतात. दोन वर्षांपासून या उद्योगावर आलेली अवकळा यानिमित्ताने दूर होण्याचे संकेत आहेत.
तुरीसोबतच कापसाच्या भावातही तेजीचे संकेत आहेत. अकोल्यातील अकोट बाजार समितीमध्ये मुहुर्ताच्या कापूस खरेदीवेळी ५ हजार ८२१ रु.प्रतिक्विंटल भाव मिळाला. सध्या खाजगी व्यापारी सहा हजार रुपयांपर्यंत कापूस खरेदीसाठी उत्सुक आहेत. कपाशीचा वाढलेला भाव कपाशीचे उत्पादन कमी येणार असल्याचे संकेत असल्याने मिळाला आहे. पावसाचा खंड व दुष्काळ यामुळे अनेक ठिकाणी कपाशीची वाढ खुंटली. आलेली बोंडे कडक उन्हाने एकाकी पूर्ण फुटली. त्यामुळे अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांचे एकाच वेच्यात कपाशीचे पीक संपले. दुसरीकडे सोयाबीननेही फटका दिला आहे.