अकोला - बूथप्रमुख हा पक्षाचा आत्मा आहे. त्यांच्यावर या निवडणुकीची माेठी जबाबदारी असल्याची जाणीव करून देत कार्यकर्ताच भाजपची संपत्ती असून, कार्यकर्त्यांची भेट घेतल्यामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त हाेते, असे सांगत केंद्रीय गृह व सहकारंमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे मनाेबल वाढविले. पश्चिम विदर्भातील अकाेला, बुलढाणा, वाशिम, अमरावती व वर्धा, तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर अशा एकूण सहा लाेकसभा मतदारसंघांचा आढावा त्यांनी मंगळवारी अकाेला येथे घेतला.
बाळापूर रोड येथील एका हाॅटेलमध्ये आयाेजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांची उपस्थिती हाेती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे . पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने झटून कामाला लागावे लागेल. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आणि विकासकामांच्या आधारावर मते मागायची आहेत. असे सांगताना त्यांनी राज्यातील लोकसभेच्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश दिला. तसेच प्रत्येक वाॅर्डात, क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ता पक्षाचे बळ असल्याचे त्यांनी सांगितले. बूथप्रमुखांवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक बूथवर सशक्त करा, पाठपुरावा करण्याचा सल्ला देत महायुतीच्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम करा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. जवळपास १ तास १५ मिनिटे त्यांनी भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.दुपारी एक वाजता सुरू झालेली आढावा बैठक दुपारी २.४५ वाजता संपली. त्यानंतर ते शासकीय माेटारीने जळगावकडे रवाना झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप राज्यातील लाेकसभेच्या ४५ जागांवर विजय प्राप्त करील असा विश्वास व्यक्त केला़. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील भारतीय जनता पक्षाचा प्रगतीचा आढावा सादर केला. संघटनात्मक कार्याची माहिती दिली.यावेळी बुलढाणा जिल्हा लोकसभेचा आढावा आमदार डॉ. संजय कुटे, अकोला आमदार रणधीर सावरकर, चंद्रपूर चंद्रकांत दुबे, अमरावती खासदार डॉ. अनिल बोंडे, तर वर्धा लोकसभेचा अहवाल सुनील बट यांनी सादर केला.