लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ओरड उद्योजकांकडून होत आहे. कुंभारी तलावाचा ताबा आणि महान धरणापासून स्वतंत्र पाणी पुरवठा पाइपलाइन टाकण्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रस्ताव अकोल्यातून पाठविले जात आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या महत्त्वाकांक्षी प्रक ल्पांना मंजुरी मिळते काय, याकडे अकोल्यातील उद्योजकांचे लक्ष लागून आहे. नागपूरनंतर अकोला एमआयडीसीचा उद्योग विदर्भात सर्वात मोठा आहे. डाळ, तेल, बेसन आणि गोल्डफिंगरच्या अकोल्यातील उद्योजकांनी आपली वेगळी छाप उमटविली आहे. विदर्भात क्रमांक दोनचा उद्योग अकोल्यात असतानाही एमआयडीसीचे विभागीय कार्यालय येथे नाही. पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना येथे नाही. दर दोन वर्षांनंतर पाणी समस्येमुळे अकोला एमआयडीसीतील पाणी टंचाईमुळे येथील उद्योजकांची गैरसोय होते. यंदाही पाणी समस्येमुळे अकोल्यातील शेकडो उद्योग अडचणीत सापडले आहेत. उद्योगांची तहान भागविण्यास एमआयडीसी प्रशासन सक्षम नाही. खांबोराहून होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यापासून कुंभारी धरणातून उद्योगांना पाणी दिले जात आहे. तीन दिवसाआड केवळ एक तास पाणी दिले जात आहे. डिसेंबरनंतर बोअर करणे आणि विहीर अधिग्रहणाचे प्रयोग सुरू होणार आहेत.कधीकाळी मलकापूर ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेला कुंभारीचा तलाव आता एमआयडीसीने ताब्यात घेण्याचा प्रयोग सुरू केला आहे. तसेच मजीप्राने स्वतंत्र पाइपलाइन बसविण्यासाठी १९ कोटींचा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविला आहे. अधिवेशनाच्या तोंडावर या दोन्ही प्रस्तावांवर गंभीरतेने विचार झाला, तर अकोल्यातील उद्योगांना संजीवनी देऊन जगविण्याचे बळ मिळेल, अशी अपेक्षा अकोल्यातील शेकडो उद्योजकांना लागली आहे.
एमआयडीसीतील पाणी टंचाईची समस्या गत अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. अकोल्यातील उद्योजक गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याचे अनेक उपाय सूचवित आहेत. मात्र त्याकडे कुणी लक्ष देत नाही. यंदाही नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्याची दखल अधिकारी किती घेतात, याकडे आमचे लक्ष लागले आहे.-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन.