लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील उद्योगांना पाणी पुरवठा करणारा कुंभारी तलाव आटल्याने आता येथील शेकडो उद्योगांना परिसरातील टँकर आणि बोअरवेल्सच्या माध्यमातून तात्पुरती जीवनदान दिल्या जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अकोल्यातील पाणीटंचाई सोडविण्यासंदर्भात बोलाविलेली बैठक अजूनही न झाल्याने उद्योजक संकटात सापडले आहेत.पाहिजे तसा पावसाळा यंदा न झाल्याने वारी वगळता इतर प्रकल्प कोरडे आहेत. अकोट-तेल्हारा वगळता अकोला जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्याही तीव्र होत आहे. महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातून खांबोराच्या ६४ खेडी प्रकल्पास आणि एमआयडीसीला पाणी पुरवठा सुरू होता. खांबोराचे अंतर आणि शहरातील पाणी समस्या लक्षात घेता हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योगांना कुंभारी तलावातून पाणी देणे सुरू झाले. तीन महिन्याच्या कालावधीत कुंभारी तलावही आटला. १२ फेब्रुवारीपासून कुंभारी तलावाचा पाणी पुरवठाही बंद करण्यात आला. एमआयडीसीतील ६०० उद्योगांतील ३०० उद्योग पाण्याअभावी शेवटच्या घटका मोजत आहेत. इतरांना मात्र आपले उद्योग जिवंत ठेवण्यासाठी बोअरवेल्स आणि टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
उद्योजकांना पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसी विभागाने दोन बोअरवेल्स खोदल्या आहेत. सोबतच दोन खासगी बोअरवेल्स अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. उद्योगांना संजीवनी देण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.-राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला.
मजीप्राच्या पाइपलाइनमधूनच एमआयडीसीला पाणी पुरवठा झाला, तर कायमस्वरूपी समस्या दूर होईल. त्यासाठी पुढील आठवड्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक होणार आहे. उद्योजकांच्या समस्या गंभीर असल्याची जाण आहे.-गोपीकिशन बाजोरिया, आमदार
कोट्यवधींची गुंतवणूक करून उभारलेले उद्योग पाण्याअभावी बंद करता येत नाही. त्यामुळे अनेकांच्या प्रोडक्शन प्रक्रियेवर प्रभाव पडला आहे. एक दिवसआड केवळ दोन तास पाणी मिळत असल्याने उद्योजक ५०० रुपयेप्रमाणे खासगी टँकर विकत घेत आहेत. -कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन, अकोला.