- आशिष गावंडे अकाेला - मित्रांच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या आमदार पुत्राला किरकाेळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी नेकलेस राेडवर घडली. याप्रकरणी सिव्हील लाइन पाेलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उध्दवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा रविवारी दुपारी त्याच्या मित्रांसाेबत नेकलेस रोडवरील एका दुकानात कपडे खरेदीसाठी गेला हाेता. त्यावेळी त्याच्या काही मित्रांचा एका दुचाकीस्वाराला धक्का लागला. दुचाकीस्वार व्यक्ती काही बाेलत असताना तेवढ्यातच आंबेडकर नगरातील सहा ते सात युवकांनी त्याठिकाणी येत आमदार पुत्रासाेबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने काही युवकांनी आमदार पुत्राला धक्काबुक्की करीत मारहाण सुरु केली. स्थानिक दुकानदारांनी मध्यस्थी केल्याने माेठा अनर्थ टळला. दरम्यान, याप्रकरणी सिव्हील लाइन पाेलिसांत सतीश गोपाल गवई (२५), मनोज विठ्ठल वाघ (३०) व सुरज गौतम डोंगरदिवे (२४) तिघेही राहणार आंबेडकर नगर, नवीन बस स्थानकामागे यांच्याविराेधात तक्रार देण्यात आली. पाेलिस ठाण्याबाहेर असंख्य शिवसैनिक जमा झाल्याने पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात केला हाेता. रात्री उशिरापर्यंत आराेपींविराेधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.
महिला म्हणाल्या, एकदा माफ करा!काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाेलिस ठाण्यात दाखल हाेत ‘वंचितां’ना न्याय देण्याची मागणी करीत या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मारहाण करताना काही अल्पवयीन मुलांचाही समावेश हाेता. त्यांच्यासह माझ्या पतीला माफ करण्याची आर्जव काही महिलांनी केली असता, आ.देशमुख यांनी या घटनेत अल्पवयीन मुलांना आराेपी न करता गंभीर स्वरुपाच्या कलम वगळण्याची सूचना पाेलिसांना केली.