- राजेश शेगाेकार
अकाेला: विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टाेबर राेजी लागल्यावर आमदार म्हणून निवडून आलेल्या लाेकप्रतिनिधींना आमदारकीची शपथ घेण्यासाठी तब्बल एक महिना प्रतीक्षा करावी लागली. अखेर २८ नाेव्हेंबर राेजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली अन् या लाेकप्रतिनिधींना संवैधानिक आमदार हाेण्याची औपचारिकता पूर्ण करता आली. या नव्या आमदारांच्या कारकिर्दीला आता एक वर्ष पूर्ण झाले; मात्र हे संपूर्ण वर्ष काेराेनाच्याच सावटात झाकाेळल्या गेल्याने आमदारांच्या कामांवर चांगल्याच मर्यादा आल्या.
अकाेल्यात भाजपाचे चार व शिवसेनेचे पाच असे निवडणुकीत शतप्रतिशत यश मिळवून युतीचे आमदार निवडून आले; मात्र राज्यस्तरावर महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या दाेन्ही पक्षांना एकमेकांच्या विराेधात भूमिका घ्यावी लागली. अकाेला पश्चिम मतदारसंघाचे आमदार गाेवर्धन शर्मा यांनी अखेरच्या क्षणी खेचून आणलेला विजय हा भविष्याच्या राजकारणाचा त्यांना मिळालेला इशारा आहे. जनसंपर्क अन् नम्रता हीच एकमेव शिदाेरी अन बलस्थान असलेल्या आ. शर्मा यांनी ताेच कित्ता नव्या टर्ममध्येही कायम ठेवला. काेराेनाच्या संकटात त्यांच्या समाजकार्याला रामनवमी शाेभायात्रेची मिळालेली साथ ही जमेची बाजू ठरली. शहरी मतदारसंघ असल्याने विकासाची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावरच येऊन पडते; मात्र त्यांनी मंजूर करून घेतलेला १५ काेटींचा निधी कायम ठेवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. महापालिकेने केलेला विकास हा पश्चिम मतदारसंघाचा विकास असेल तर महापालिकेच्या अपयश अन घाेटाळ्यांचीही जबाबदारी त्यांच्यावर येणे स्वाभाविकच आहे. अकाेला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांना दुसरी टर्म सुरू करतानाच जिल्हाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा बाेनस मिळाला. पळसाे बढेच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेसाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि यश ही त्यांच्या जमेच्या बाजूची एक बाजू आहेच; मात्र शिवसेनेने भाजपासमाेर विशेषत: महापालिकेत त्यांच्या पक्षाची केलेली काेंडी ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कशी फाेडतात यावर त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाचेही मूल्यमापन हाेईल. आमदार नितीन देशमुख यांनी पहिल्याच टर्ममध्ये आक्रमक हाेण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने त्यांच्याच पक्षाचे सरकार आल्यामुळे त्यांनी मतदारसंघासाठी निधी आणण्याचा अन् वळविण्याचाही सपाटा लावला आहे. ताे वानच्या पाणी वळवण्यापर्यंत पाेहोचला आहे; मात्र त्यांच्या वेग पाहता आता पक्षातही सुरू झालेली कुजबुज भविष्यात त्यांच्यासाठी अडचण उभी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकाेट मतदारसंघातून विजयी झालेले आमदार प्रकाश भारसाकळे यांनी स्वपक्षाच्या विराेधासह मित्रपक्षाचाही विराेध माेडून काढत विजय मिळवला; मात्र गेल्या वर्षभरात काेराेनाच्या सावटात त्यांच्याकडून अपेक्षीत असलेल्या विकासाची गती मंदावलीच आहे. मतदारसंघासाेबतच स्वत:चे आराेग्य सांभाळत त्यांना गेल्या वर्षभरात वाटचाल करावी लागली आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी शेवटच्या क्षणी आपली जागा कायम ठेवत विजय मिळविल्यामुळे ते आता तरी जनतेत मिसळून काम करतीलए अशी अपेक्षा हाेती; मात्र काेराेनाच्या निमित्ताने त्यांनी अलगीकरणावरच भर देत पक्षाचे कार्यक्रम राबविण्याव्यतिरिक्त फारसे प्रयास केले नसल्याचे चर्चा मतदारसंघात आहे. ते गेल्यावेळी आमदार हाेते त्यावेळी अर्धवट असलेल्या कामांना मार्गावर आणता आणताच काेराेनामुळे लागलेल्या निधीच्या कात्रीची अडचण त्यांच्या समाेर आल्याने विकासाचे प्रगतिपुस्तक सध्या तरी लाल शेऱ्यात आहे. ते पुढील चार वर्षात कसे बदलते, हे कळेलच.