लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी, या मागणीकडे समाजकल्याण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिष्यवृत्ती संघर्ष कृती समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाली बजाओ’ आंदोलन छेडण्यात आले. जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक हजारो विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्तीचा लाभ अद्याप मिळाला नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याची मागणी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे यापूर्वी निवेदनाद्वारे तसेच धरणे आंदोलनाद्वारे करण्यात आली; मात्र विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले नाही. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी करीत, यासंदर्भात समाजकल्याण विभाग व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिष्यवृत्ती संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाली बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रोहित वानखडे, आकाश कवडे, संदीप तायडे, विजय भगत, आकाश हिवराळे, शैलेश बोदडे, अंकुश तायडे, आकाश सोनोने, अनिरुद्ध वानखडे, अंकुश गावडे, राहुल सारवान, अक्षय गडेकर, संकेत सोनकर, सारंग शिंदे, शुभम व्यवहारे यांच्यासह इतर विद्यार्थी सहभागी झाले होते.
अकोला : शिष्यवृत्तीसाठी ‘थाली बजाओ’ आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:51 AM