अकोला : महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी लेट लतिफ कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा बडगा उचलला आहे. साेबतच आता कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या नोंदवहीची तपासणीही सुरू केली आहे. दरम्यान, मंगळवारी आणखी ३९ कर्मचारी लेट लतिफ हाेते. त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे निर्देश दिले आहेत.
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपा मुख्य कार्यालयातील विविध विभागातील दैनंदिन कामकाजाची नोंद वही (वर्क रजिस्टर)ची तपासणी केली, तसेच सामान्य प्रशासन विभागानी मनपातील प्रत्येक विभागाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच ज्या कर्मचा-यांनी आतापर्यंत वर्क रजिस्टर तयार केलेला नाही त्यांचा अहवाल सादर करण्यासाठी सूचना दिल्या. तसेच यावेळी मनपा आयुक्त यांनी कार्यालयात उशिरा येणारे तसेच पूर्वपरवनगी न घेता गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला मनपातील प्रत्येक कर्मचारी यांनी दैनंदिन केलेल्या कामांची नोंदवही (वर्क रजिस्टर) मध्ये नोंद ठेवणे बंधनकारक आहे अशा सूचना दिल्या.
२० ऑक्टोबर रोजी ३९ कर्मचारी गैरहजर असलेले आढळून आले. त्यामध्ये काेविड कक्षातील १, आरोग्य (स्वच्छता) १, विद्युत विभागातील १२, माहिती अधिकार कक्ष १, नगररचना विभागातील १, जलप्रदाय विभागाचे २, नगररचना विभागातील १, पूर्व झोन कार्यालयातील २, उत्तर झोन कार्यातील १६, दक्षिण झोन कार्यालयातील ३ असे एकूण ३९ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे.