अकोला - महापालिका प्रशासनामध्ये शिस्त लावतानाच कामाचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्राधान्य देत कामकाज सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेत कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांची गुरुवारी परीक्षा घेण्यात आली. संगणक परिचालकाला संगणकाचे प्राथमिक ज्ञान किती आहे, याच मुद्द्याच्या अनुषंगाने ही परीक्षा होती; मात्र २३ पैकी ९ कर्मचाºयांना यामध्ये पास होता आले नाही. त्या सर्वांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. अप्रशिक्षित अशा संगणक परिचालकांची भरती करून महापलिकेने आतापर्यंत त्यांच्या वेतनावर लाखोंची उधळण केल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.महापालिकेत कंत्राटी, आस्थापना तथा आउट सोर्सिंग कंपनीमार्फत संगणक परिचालकांना रूजू करून घेण्यात आले आहे. त्यांचा वर्ग व परीक्षा स्वत: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी गुरुवारी महापालिकेतील संगणक विभागात घेतली. विशेष म्हणजे अनेकांना संगणक चालविण्याचेही ज्ञान नसल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे अशा अप्रशिक्षित कर्मचाºयांना आयुक्तांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे. पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन, एक पानाचे कम्पोजिंग अशा स्वरूपात ही परीक्षा होती. महापालिका प्रशासनामध्ये आउट सोर्सिंगच्या माध्यमातून तथा मानसेवी म्हणून संगणकचालकांची सुमारे ५० ते ६० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. मूळ काम असलेल्या संगणकचालकांना साधे संगणक कसे हाताळावे, याचे झान नसल्याची गंभीर बाब या परीक्षेत समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी महापालिकेचे वेतन घेत असून, त्यांच्या वेतनावरील खर्च हा निव्वळ वाया गेल्याचे समोर आले आहे. गुरुवारी २३ संगणक परिचालकांची परीक्षा झाली, त्यापैकी नऊ परिचालक नापास झाले.