अकोला: थकीत देयकांमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या काही कंत्राटदारांनी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित कर्मचार्यांची धांदल उडाली. मनपामार्फत शहरात रस्ते, नाल्या, जलवाहिन्या दुरुस्तीसह विविध विकास कामे करणार्या कंत्राटदारांची देयके मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. एकीकडे मनपा निधीतून केलेल्या विकास कामांच्या देयकांसाठी पैसा उपलब्ध नसल्याची सबब प्रशासनाकडून समोर केल्या जात असली तरी दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या रोख निधीतून केलेल्या कामांची देयकेसुद्धा मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मंजूर केली नसल्याची वस्तुस्थिती आहे. लोकप्रतिनिधींच्या रोख निधीतून केलेल्या विकास कामांची तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्यावर तीन महिन्यांपासून मुख्य लेखा परीक्षक, लेखा परीक्षक, कार्यकारी अभियंता व संबंधित कामावरील अभियंता तपासणीची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत.
अकोला मनपा आयुक्तांच्या दालनात तोडफोड
By admin | Published: October 31, 2014 1:26 AM